नोएडा : जर्मनीची कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूनं आज आपल्या स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल 'एक्स-3'चं नवीन व्हर्जन बाजारासमोर आणलंय.
दिल्लीमध्ये या गाडीची किंमत 49.9 लाख रुपये आहे. कंपनीची नवी कार एक्स-3मध्ये केवळ ‘डीझेल इंजिन’चा पर्याय दिला गेलाय. कंपनीच्या चेन्नईच्या प्लान्टमध्ये या गाडीचं उत्पादन सुरू आहे. संपूर्ण भारतात आजपासून कंपनीनं या गाडीची विक्री सुरू केलीय.
देशात लग्जरी गाड्यांच्या श्रेणीत आक्रमक विस्तार करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, नवी एक्स-3 44.9 लाख रुपये आणि 49.9 लाख रुपये (दिल्ली शोरुम किंमत) अशा दोन स्वरुपात उपलब्ध होईल. यामध्ये क्रुझ नियंत्रण करणारी आठ स्पीडची स्वयंचलित ट्रान्समिशन प्रणालीसारखे अनेक फिचर्स आहेत.
‘एक्स-3’चं पहिलं मॉडल कंपनीनं 2003 साली बाजारात उतरवलं होतं. यानंतर कंपनीनं 2011 मध्ये याच गाडीचं नवीन रुप सादर केलं होतं. आज, कंपनीनं तिसऱ्यांदा याच गाडीचं नवीन स्वरुप सादर केलंय.
2014 मध्ये बीएमडब्ल्यूच्या एम-3 सेडान, एम-4 कूपे आणि एम-5 सेडान या गाड्याही लवकरच सादर होतील, अशी आशा कंपनीनं यावेळी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.