'भारतबेरी'ची 'ब्लॅकबेरी'ला टक्कर

'ब्लॅकबेरी'ला आता पूर्णपणे स्वदेशी 'भारतबेरी'ची टक्कर राहणार आहे.

Updated: Nov 15, 2011, 07:40 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
'ब्लॅकबेरी'ला आता पूर्णपणे स्वदेशी 'भारतबेरी'ची टक्कर राहणार आहे. मोबाईलवर केव्हाही आणि कुठेही ई-मेल (पुशमेल) सेवा उपलब्ध असणारी 'भारतबेरी' सेवा भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) बालदिनाच्या मुहूर्तावर बाजारात आणली.

 

 

'बीएसएनएल'च्या कोणत्याही प्रीपेड व पोस्टपेड जीएसएम ग्राहकाला 'एसयूबी बीबी' हा एसएमएस ५११२३या क्रमांकावर पाठवून 'भारतबेरी' सेवा सुरू करता येईल. या सेवेसाठी दरमहा ८० रुपये शुल्क असून, सुरवातीला एक महिना निःशुल्क सेवा दिली जाईल. 'एमटीएनएल'च्या मुंबई आणि दिल्ली सर्कलसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा देण्यात आली. त्याच्या यशस्वी परिणामानंतर देशभरात ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

या सेवेसाठी ग्राहकांना दिवसाला फक्त दोन रुपये खर्च येईल. 'बीएसएनएल' आणि 'एमटीएनएल'च्या नेटवर्कसाठी मर्यादित असलेल्या या सेवेसाठीचा 'सर्व्हर' भारतातच असल्याने देशाच्या दूरसंचारविषयक सुरक्षेचे सर्व निकष यात पाळले गेले आहेत.

 

 

'भारतबेरी'मुळे  'बीएसएनएल' आणि  'एमटीएनएल'च्या सर्व सर्कलमधील ग्राहकांना 'पुशमेल सेवा' मिळेल. त्यासाठी कोणताही विशिष्ट हॅन्डसेट खरेदीची ग्राहकांना गरज नसून ब्लॅकबेरी, सिम्बियन, ऍन्ड्रॉईड, विंडोज मोबाईल आणि 'जेटूएमई' या कोणत्याही कार्यप्रणालीवर (ऑपरेटिंग सिस्टिम) आधारित सर्व हॅन्डसेट्‌सला 'भारतबेरी' सेवा चालू शकेल.