शेंगदाण्यांमध्ये असतो आरोग्याचा खजिना

भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 19, 2012, 06:29 PM IST

www.24taas.com
भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.
भूईमुगाचे शेंगदाणे हे वनस्पतीजन्य प्रोटिन्सचं सर्वाधिक स्वस्त स्त्रोत आहे. १०० ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यामध्ये १ लीटर दुधाएवढं प्रोटिन असतं. शेंगदाण्यांमध्ये २५% हून जास्त प्रथिनं असतात. शेंगदाण्यांमुळे पचनशक्ती वाढते. २५० ग्रॅम दाण्याच्या कुटात जितकी खनिजं आणि व्हिटामिन्स असतात, तितकी जीवनसत्व २५० ग्रॅम मांसामध्येही नसतात. हिवाळ्यामध्ये शेंगदाण्यांचे विशेष फायदे असातात.
शेंगदाण्यांमधून दूध, बदाम, तूप यांचे फायदे पोहोचतात. खनिजं, अँटी-ऑक्साइड, व्हिटामिन्स शरीराला मिळतात. रक्ताभिसरण वाढतं. त्वचेला तेल मिळतं. त्यामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष राहात नाही. एका अंड्याच्या किमतीत जेवढे शेंगदाणे मिळतात, तेवढे खाऊन होणारा फायदा दूध आणि अंडी एकत्र खाण्यानेही मिळत नाही.
शेंगदाण्यांमध्ये उष्णता असल्याने हिवाळ्यात शेंगदाणे खाल्लयास शरीराला उष्णता मिळते. शेंगदाण्यांमुळे जेवण रुचकर बनतं. फुप्फुसांना ताकद मिळते. मात्र गरम प्रकृतीच्या लोकांसाठी जास्त शेंगदाणे खाणं हानीकारक ठरू शकतं.