मुंबईत आलाय `मॅरेज डिटेक्टिव्ह`चा ट्रेंड

चहा-पोहेचा कार्यक्रम झाला, मुलगा-मुलीला आणि मुलगी मुलाला पटली की उडवा लग्नाचा बार, म्हणजेच चट मंगनी पट ब्याह, पण आधुनिक काळात हे सर्व काही बदलत चाललंय.

Updated: May 7, 2014, 04:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चहा-पोहेचा कार्यक्रम झाला, मुलगा-मुलीला आणि मुलगी मुलाला पटली की उडवा लग्नाचा बार, म्हणजेच चट मंगनी पट ब्याह, पण आधुनिक काळात हे सर्व काही बदलत चाललंय.
लाईफ स्टाईल बदलल्याने लोकांच्या सवयीही बदलतायत. एकमेकांना देण्यासाठी वेळ फारच कमी झालाय. एवढंच काय कुटुंबियांचंही एकमेकांकडे फारस लक्ष द्यायला वेळ नाही.
प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असल्याने कुणाला लग्न जमवायलाही वेळ नाही. कुणासाठी स्थळ सुचवायचे दिवस आता जवळ-जवळ शहरात तरी राहिलेले नाहीत.
आता लग्न जमवण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जातेय. एका क्लिकवर हजारो स्थळं डोळ्यासमोर येतात. मात्र प्रत्यक्ष कुणी कुणाला पाहिलेलं नसतं, सुरूवातीला काल्पनिक वाटावं असं हे सर्व असतं. प्रोफाईलवर लिहलेली माहिती खरी आहे, याची शाश्वती कोण देणार?
ऑनलाईन लग्न जमवणं आणि ऑनलाईन शॉपिंग यात खूप मोठा फरक आहे. ऑनलाईन शॉपिंग दिवसात कितीतरी वेळा करता येईल. पण ऑनलाईन लग्न जमवणं स्थळ पाहणं काही शॉपिंग नाही.
मग स्थळाबद्दल शंका असल्याने आता मॅरेज डिटेक्टिव्ह नेमले जात आहेत. आता लग्नाच्या बाजारात एक नवा ट्रेंड सुरू झालाय. तो म्हणजे लग्न ऑनलाईन जमवायचं पण मुलगा किंवा मुलीची माहिती तपासण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत घ्यायची.
 
या मॅरेज डिटेक्टिव्हकडून मुलगा किंवा मुलीचं शिक्षण, नोकरी, वागणूक आणि एकूणच सगळी माहिती काढली जाते. अलीकडेच एका डॉक्टर मुलीला फसवणा-या भामट्याचा या मॅरेज डिटेक्टिव्हनं पर्दाफाश केला.
या मॅरेज डिटेक्टिव्हचा ट्रेंडमध्ये आणखी एक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. ते म्हणजे सध्या अशा तोतया मॅरेज डिटेक्टिव्हचाच सुळसुळाट झालाय. त्यामुळे लग्न जमवताना पारखूनच लग्नगाठ पक्की करा आणि सावध राहुनच शुभमंगल नक्की करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.