महिलांनो जास्त गोड खाऊ नका...

प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या खाण्याबाबतही जागरूक असायला हवं.

Updated: Apr 23, 2013, 08:37 AM IST

www.24taas.com, मुंबई
प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य व सौंदर्य या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या खाण्याबाबतही जागरूक असायला हवं. अनावश्यक अशा साखरेचे सेवन आपण करत आहोत व तेही नैसर्गिक नव्हे, तर कृत्रीम स्वरूपात. म्हणूनच त्या गोड पदार्थापासून अनारोग्य व सौंदर्यास गालबोट लागणे, असे कडवट अनुभवच जास्त आहेत.
आपणास आवश्यक व उपकारक अशी नैसर्गिक शर्करा फळे, भाज्या, दूधजन्य पदार्थ इ. तून प्राप्त होत असते. परंतू चॉकलेटस्‌, केक, शितपेये, इ. सेवन केली जाणारी साखर ही मात्र आपल्या शरीरास हानीकारक असते. आपले दात नक्‍कीच आपल्या सौंदर्यात भर घालतात. पण खूप प्रमाणात व सातत्याने गोड खाणाऱ्या व्यक्तींचे दात किडतात. कारण दातातील सूक्ष्म जीव हे गोड पदार्थातील साखरेनेच पोसले जातात, वाढतात व त्याच्यातून स्त्रवणारे आम्ल त्यांच्यावर कीड पसरविण्यास हातभार लावत असते. याखेरीज दातास चिकटणारे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ, गोळ्या इ. ही यास मदतच करतात. म्हणून या सर्वांचे सेवन कमी करणे, नेहमी चूळा भरणे व दात ब्रश करणे आवश्यक असते.

साखर न खाणे, कमी खाणे, हा नियम केवळ मधुमेह्यांपुरताच असतो, असे मानणे चुकीचे ठरते, कारण याचे अतिरेकी सेवन व अन्य अनुकूल कारणे एकत्र आली, तर निरोगी स्त्रीसही हा विकार जडू शकतो हे विसरू नये. जरूरीहून अधिक प्रमाणात साखरेचे गोड पदार्थ खाणे म्हणजे अनेक शारीरिक दोष, आजार यांना आमंत्रण देणे होय. उदा. वजन वाढणे, शरीर बेडौल होणे व एकदा वजनावरील नियंत्रण सुटले, की त्या जोडीलाच व्यक्ती अन्य अनेक आजारांची शिकार होते.