www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.
इंशुलिन तयार करण्याची शरीराची क्षमता कमी झाली किंवा तयार झालेलं इंशुलिन योग्य पद्धतीनं उपयोगात आणलं जात नसेल तर हा रोग होऊ शकतो. अशा प्रकारच्या कमतरतेमुळं रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीस मधुमेह झालेला आहे असे निदान झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या दैनंदिन आहारामध्ये बदल करावेत, नियमितपणे व्यायाम करावा आणि औषधांचं प्रमाण वाढवावं या सर्व गोष्टी अपेक्षित असतात.
भारतामध्ये ६० दशलक्ष व्यक्ती मधुमेहानं आजारी आहेत आणि ही संख्या वेगानं वाढतेय. हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणं, ब्रेनस्ट्रोक, अंधत्व, स्नायू क्षतिग्रस्त होणं आणि अनियमित रक्तपुरवठ्यामुळं अवयवच्छेदन करावं लागणं यासारख्या समस्यांची शक्यता अनियंत्रित मधुमेहामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते.
दुर्देवानं सखोल संशोधन, शैक्षणिक कार्यक्रम आणि औषधांची उपलब्धता यासारखे विविध उपाय करूनही जगभरातील ५० टक्के आणि मुंबईतील ७० टक्के मधुमेही रुग्णांचा आजार हा अनियंत्रित अवस्थेत आहे. याचा परिणाम म्हणून अगतिकता आणि नैराश्याची भावना रुग्णांमध्ये वाढु शकते आणि त्यांचं आय़ुष्यमान कमी होऊ शकतं.
१९५०मध्ये बॅरिऐट्रिक सर्जरी हा शस्त्रक्रियेचा एक नवीन प्रकार सुरू करण्यात आला. सुरुवातीला ही शस्त्रक्रिया अतिलठ्ठ व्यक्तींचं वजन कमी करण्यासाठी केली जात असे. मात्र त्यामुळं बहुतेक रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित होत असल्याचंही दिसून आलं. २००४पासून याबाबत केलेले अनेक प्रकारचे संशोधन आणि अभ्यासातून असं निष्पन्न झालं आहे की, ८० टक्के ते ९० टक्के मधुमेहींचा आजार या शस्त्रक्रियेनंतर कमी होऊ शकतो. आजाराचं प्रमाण कमी होतं याचा अर्थ असा की कोणत्याही औषधांशिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण सामान्य राहतं.
सुरूवातीस वजन घटविण्याच्या प्रक्रियेतून प्राप्त झालेला पूरक लाभ या दृष्टीनं या गोष्टीकडं पाहिलं जात असे. मात्र आता ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे की, बॅरिएट्रिक सर्जरीमुळं मधुमेहाचं प्रमाण कमी होणं हा वजन घटल्यामुळं होणारा पश्चात परिणाम नसून या शस्त्रक्रियेचा थेट परिणाम आहे. बऱ्याच रूग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रिया झाल्यानंतर ३ ते ७ दिवसांत रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित होतं. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वजन घटण्यास सुरूवात होण्याआधीच हा बदल दिसून येतो. या शस्त्रक्रियेमुळं आतड्यातील इन्क्रेटिन्स नामक संप्रेरकांवरही परिणाम होतो. या संप्रेरकांमुळं टाईप टू प्रकारचा मधुमेह होतो असं मानलं जातं.
बॅरिएट्रिक सर्जरीचा सुधारित प्रकार म्हणजे इलिल ट्रान्सपोझिशन सर्जरी ही शस्त्रक्रिया बारीक अंगकाठी असलेल्या मधुमेही रूग्णांवर केली जाते आणि ती देखील सारखीच प्रभावी आहे. अलिकडेच, बॅरिएट्रिक किंवा मेटॅबोलिक सर्जरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रियेस इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन, अमेरिकन सोसायटी ऑफ मेटॅबोलिक ऐन्ड बॅरिएट्रिक सर्जरी आणि ओबेसिटि सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांनी स्वीकृती दिलेली आहे.
मधुमेहासारख्या आजाराच्या बाबतीत आत्ता दिसणारी परिस्थिती संपूर्णपणे बदलण्यासाठी केवळ थोडासा काळ जाण्याची गरज आहे. थोड्या अवधीनंतरच भारतातील ७० टक्के मधुमेही रूग्णांचा आजार केवळ आटोक्यातच येणार नाही, तर त्यांना साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याकरिता दररोज इंजेक्शन्स किंवा औषधं घेण्याच्या कटकटीपासूनही सुटका करून घेता येईल.
मधुमेहाची योग्य काळजी आणि प्रतिबंध करण्यासाठीः
> तुम्ही आणि तुमचे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांनी निश्चित केलेला पोषक आहार नियमितपणे सेवन करा.
> महिन्यातील अधिकाधिक दिवस शक्यतोवर दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. तुमच्यासाठी कशाप्रकारचा व्यायाम योग्य ठरेल, याविषयी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
> ठरवून दिल्याप्रमाणं औषधांचं नियमित सेवन करा.
> रक्ततातील साखरेचं प्रमाण दररोज तपासून पहा आणि प्रत्येकवेळेस त्याची नोंद तुमच्या नोंदवहीमध्ये करून ठेवा.
> तुमच्या पायांना जखम, फोड, गळु, सूज, लालसरपणा किंवा नखांजवळ सूज येणं यासारख्या समस्या नाही आहेत ना, याची दररोज खात्री करून घ्या.
> दररोज दात घासा आणि फ्लॉस करा.
> रक