www.24taas.com,नागपूर
शिवसेनेवर अविश्वास ठराव रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर तो दोन दिवसांत मांडणे गरजेचं असतं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावामुळे कामकाज तहकूब होतं, तर दुस-या दिवशी भाजपचा मोर्चा होता. त्यामुळे शिवसेना दोन दिवसांत ठराव मांडू शकली नाही.
अविश्वास प्रस्ताव ठराव रद्द झाल्यामुळं विरोधकांमध्ये समन्वय नव्हता अशी कबूली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.. तसंच अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी अध्यक्षांना फेरविचाराबाबत विनंती करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
नागपूरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनातला गोंधळ कायम आहे. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. आर.आर. पाटील यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याचा निषेध करत विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला. त्यावर आपण धमकावण्याच्या उद्देशानं बोललो नव्हतो. त्यामुळे माफी मागणार नाही, असं पाटील यांनी सांगितलं.
गोंधळात विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू होताच सिंचन घोटाळ्याबाबत SIT नेमण्याची मागणी करत पुन्हा गोंधळ घातल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं... SITच्या मागणीसाठी विधान परिषदेतही गदारोळ झाल्यानं दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.