www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मुंबईतील मेट्रोला कधी मुहूर्त मिळणार, असा नेहमी प्रश्न विचारला जातो. मात्र, हा प्रश्न आता विरावा लागणार नाही. दोन ते तीनवेळा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर मेट्रो आता २०१४च्या जानेवारी अखरेपर्यंत धावण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेत.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या पहिल्या टप्यातील प्रकल्पावरील मूळ अंदाजित खर्च २३५६ कोटी रुपये होता तो विविध कारणांमुळे ४ हजार ३२१ कोटी रुपये झाल्याने १९६५ कोटी रुपयांनी वाढला असल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी विधानसभेत दिली. या मार्गावर जानेवारी २०१४ पासून मेट्रो धावू लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार गणपत गायकवाड, नवाब मलिक यांनी लेखी प्रश्न विचारले होते. त्यामुळे मुख्यंमत्र्यांनी ही माहीती दिली. दरम्यान कामाला उशिर होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मेट्रो मार्गिका ही वर्दळीच्या भागातून जात असून, तिच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. धार्मिक स्थळांचे स्थलांतर, भूसंपादन, वाहिन्यांचे स्थलांतर , वाहतूक आणि रेल्वे विभागाकडील आवश्यक परवानगी आदी कारणांमुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही, असे ते म्हणालेत.
तिकिट भाड्यापेक्षा अधिकचे भाडे ठरवून द्यावे, अशी विनंती मुंबई मेट्रो वन प्रा.लि.या कंपनीने केली आहे. ही मागणी मूळ सवलत कराराशी सुसंगत आहे की नाही याची कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळविण्याची कार्यवाही सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मेट्रोच्या टप्पा दोन प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यास मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सीआरझेडमधील जाचक अटींमुळे असर्मथता दर्शविली आहे. या अटी शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.