पोलिसांनी सुपारी घेऊन केला शिवसैनिकांवर हल्ला - उद्धव

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी कणकवलीत शिवसैनिकांशी संवाद साधला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 26, 2013, 03:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी कणकवलीत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांनी नारायण राणेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांवर लाठीमार केल्याचा आरोप केलाय तसंच पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणीही केलीय.
२४ तारखेला सिंधुदुर्गात काँग्रेस आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या आमने-सामने या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. यावेळी परिस्थिती तणावग्रस्त होणार हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना अटक केली. त्यानंतर शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक शिवसैनिक जखमी झाले होते. याप्रकरणानंतर उद्धव ठाकरे आज इथं दाखल झालेत. ‘आमचं आव्हान स्विकारण्याची ताकद काँग्रेसमध्ये राहिलेली नाही म्हणून त्यांनी पोलिसांना नोकरासारखं वागवलंय. मी सगळ्या पोलिसांना दोषी धरत नाही... पण खास करून ज्या पोलिसांनी सुपारी घेऊन आमच्यावर हल्ला केला त्यांचा आम्ही ब्लॅक लिस्टही तयार केलीय... जरा थोडे दिवस थांबा उद्याचं सरकार आमचंच असणार आहे’ असं म्हणतानाच भूलथापा देणाऱ्यांचं स्मारक, थडगं उभारा असं आव्हानच त्यांनी शिवसैनिकांना दिलंय. भाडोत्री गुंडापुंडांमुळे काँग्रेसची प्रतिमा डागाळल्याची टीका त्यांनी केलीय.
राष्ट्रवादीची कोकणात उरलेली ताकद वाचवायची असेल तर आर.आर.पाटलांनी कारवाई केली पाहिजे अशी टीकाही उद्धव यांनी यावेळी केलीय.

व्हिडिओ पाहा :-

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.