www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
लॉटरी लागल्यामुळे रातोरात कोट्यधीश झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पण लॉटरी लागल्यानंतर ही लाखो रुपयांची बक्षिसं घेण्याला कोणीच आलं नसल्यानं गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य लॉटरीची बक्षिसाची १ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम सरकार दरबारी पडून असल्याचं उघड झालंय.
एका रात्रीत रंकाला राजा बनवणारी लॉटरीची तिकीटं... पण, महाराष्ट्रात अनेक असेही आहेत की ज्यांना बक्षीस लागल्यानंतरही ते आपलं बक्षीस घ्यायला आलेच नाहीत. गेल्या तीन वर्षात राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’च्या माध्यमातून ११७ कोटींचा व्यवहार केला. त्यातून २२ कोटी बक्षिसाच्या रूपाने वाटप केल्यानंतर उरलेल्या ९४ कोटी रुपयांचा सरकारला नफा झाला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने आपल्याला २२ कोटी नफा झाल्याचे दाखवले मग उरलेला पैसा कशावर खर्च केला? याचं उत्तर सरकारने दिलं नाही. जो निधी सरकार दरबारी पडून आहे तो एक तर तिकीट हरवल्याने किंवा सरकारची दोन महिन्यांची मुद्दत संपल्याने सरकारकडे पडून असल्याचं लॉटरी विक्रेता रमेश कांबळे यांनी म्हटलंय.
कोट्यवधी रुपये सरकार दरबारी पडले असताना, आता प्रश्न पडतो की हा पैसा अधिकाऱ्यांच्या घशात जाईल की सरकारच्या तिजोरीत राहील?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.