www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
झोपडपट्टीतील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चक्क बाटली बंद पाणी देण्याचा विचार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने ही जबाबदारी खासगी कंपनीच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय केलाय.
नागरिकांना शुद्ध, र्निजतुक पाणी मिळावे म्हणून पाण्याचा पुरवठा महापालिका करणार आहे. परंतु त्याचे अतिशुद्धीकरण करून ते महापालिका हद्दीतील ५२ टक्के झोपडपट्टीवासीयांना वितरित करणार आहे. त्यासाठी खासगी कंपनीला ठेका देण्यात येणार आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील नऊ लाख झोपडीवासीयांना महापालिकेच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
२० लिटर पाण्यासाठी दहा रुपयेच मोजावे लागणार आहेत. ठाणे महापालिकेने मध्यंतरी सादर केलेल्या एका अहवालानुसार महापालिका हद्दीतील तब्बल ५२ टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टयांमधून वास्तव्य करते. त्यासाठी पालिकेडून दररोज सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी ३५ टक्क्य़ांहून अधिक पाणी झोपडपट्टयांमध्ये वितरीत केले जाते.
झोपडपट्टी विभागात अशुद्ध पाण्यामुळे साथींचे आजार बळवतात. दाटीवाटीचा भाग, अरुंद गल्ल्या तसेच संयोजनातील अडचणींमुळे हा अशुद्ध पाणी पुरवठा होतो, असा नवा शोध ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने लावला असून त्यावर उपाय म्हणून बाटलीबंद शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.