www.24taas.com, झी मीडिया, कुडाळ
महाराष्ट्रात मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आले आहेत. सिंचनाच्या घोटाळ्याने तर कहरच केला आहे. तरीही काँग्रेसवाले निर्लज्जम् सदासुखी आहेत. भास्कर जाधवांनी मुलांच्या लग्नात उधळपट्टी केली म्हणून झोप उडाली, असे सांगणारे शरद पवार हे त्यांचे मंत्री करत असलेल्या भ्रष्ट्राचाराकडे डोळेझाक करीत आहेत. पवार हेच खरे भ्रष्ट्राचाऱ्यांचे पोशिंदे आहेत, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत केला.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. जैतापूर प्रकल्पामुळं महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होणार आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. विकासाला शिवसेनाचा विरोध नाही. मात्र सामान्यांच्या मुळावर येणारे प्रकल्पांना शिवसेनेचा कायम विरोध असेल असं उद्धव यांनी म्हटलंय.
कुडाळ इथं उद्योगमंत्री नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव यांनी राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल केला. कोकणवासियांना विकासाची खोटं स्वप्न दाखवणारे आमदार-खासदारांनी काय केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतलं. कोकणातील खासदार लोकसभेत आवाज उठवायचे. नाथ पै, मधु दंडवते तसेच सुरेश प्रभू यांचे विचार ऐकण्यासाठी संसदेत शांतता असायची. आताचे खासदार काय करतात, ते त्यांनाच माहित. यापुढे कोकणवासियांना गृहित धरणा-यांनाही उद्धव यांनी सूचक इशारा यावेळी दिला. कोकणवासियांची सटकली तर खैर नाही असंही उद्धव म्हणालेत.
पक्षातील जबाबदार म्हणणारे नेते अजित पवार हे काय बोलतात, हे त्यांचेच त्यांना कळत नाही. राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. यांची पवारांना चिंता नाही. यांचे मंत्री भ्रष्ट्रातात गुंतलेले आहेत. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. हजारातील कामे कोटींच्या घरात कशी पोचलीत, याचे यांच्याकडे उत्तर नाही. जनतेला पाणी दिले गेले नाही. कोकणातील धरणांबरोबरच राज्यात अनेक धरणांची कामे अर्धवट स्थितीत आहेत.
आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे भोगून कोकणवासियांना विकासाची खोटी स्वप्ने दाखविणार्या उद्योगमंत्र्यांना फडफडवताना उद्धव ठाकरे म्हणाले,
विकास होणार असेल तर त्याच्यासोबत आम्ही आहोत. कोकणी माणसाच्या, मायभगिनींच्या चेहर्यावर हसू फुलवा. आम्ही स्वागत करू, राजकारणही बाजूला ठेवू. आहे हिंमत तुमच्यात हे स्वीकारण्याची? आमच्या मनात पाप नाही, पण तुमच्या मनात पुण्य आहे काय? टाळंबा, तिलारी प्रकल्प कधी पूर्ण होणार? या धरणांच्या किमती वाढून दोन हजार कोटींच्या घरात गेल्या. रेडी बंदराचा विकास झाला का? गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ असताना चिपीत विमानतळ होऊ शकते काय? प्रकल्पाच्या नावाखाली कोकणवासीयांच्या जमिनी विकासकांना विकायच्या, उपर्यांना इथे आणायचे आणि कोकणी माणसांला भिकारी करायचे हे धंदे चालणार नाहीत. गाठ शिवसेनेशी आहे लक्षात ठेव.