www.24taas.com, ठाणे
ठाण्यात मराठी कलाकारांचा मराठमोळा थाट पाहायला मिळाला...निमित्त होतं मिफ्ता महोत्सवाच्या कलाकारांच्या दिंडीचं...महेश मांजरेकर आणि त्यांच्यासोबत मराठी कलाकारांचा जल्लोष इथे पाहायला मिळाला..ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात हा महोत्सवात राज ठाकरे यांच्या भाषणाने रंगत आणली.
भाषणाच्या सुरूवातीलाच सुरक्षेत्रला मनसेने अचानक दिलेल्या परवानगीबद्दल राज यांनी बोलायला सुरूवात केली. आधी सुरक्षेत्रवर बंदी घालण्याची मागणी घालणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक या कार्यक्रमाला परवानगी दिल्याने अनेकजणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, बोनी कपूर हे मला भेटायला आले, तेव्हा अक्षरशः रडकुंडीला आले होते. त्यांच्यावर बरंच कर्ज असल्यामुळे त्यांची अवस्था बिकट आहे. अशावेळ या शो ला मी परवानगी न दिल्यास त्यांची अवस्था आणखी खराब झाली असती. म्हणून मी अखेर या कार्यक्रमाला परवानगी दिली. मात्र याचवेळी त्यांना इशाराही केला आहे, की पाकिस्तान आपल्याशी कसं वागतं, याची जाणीव त्यांनी ठेवावी, आणि पुन्हा असे कार्यक्रम करू नयेत. या वेळी भाषणात आपल्या रोखठोक शैलीत राज ठाकरे म्हणाले, “मी मांडवली धंदे करत नाही.”
मराठी सिनेमांबद्दल बोलताना राज म्हणाले, की मी मराठी सिनेमांसाठी लढून त्यांना स्क्रीन मिळवून देऊ शकतो पण प्रेक्ष त्यांचा त्यांनाच कमवावा लागेल. हिंदीपेक्षा मराठीत बनणाऱ्या मालिका या अप्रतिम असल्यामुळे त्या सोडून प्रेक्षकांनी मराठी सिनेमा पाहायला यावं, असे सिनेमे निर्माण झाले पाहिजे.
प्रयोगशील सिनेमांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी साजिद नाडियदवाला या हिंदी व्यावसायिक निर्मात्याचं उदाहरण दिलं. “सिनेमात प्रयोग करा. पण, हे प्रयोग करण्यासाठी आधी सिनेमातून पैसे कमवा. एकदा पैसे मिळाले की सिनेमात हवे ते प्रयोग करा. सिनेमा ही माझी पॅशन आहे. जर मी राजकारणात आले नसतो, तर मी फिल्म मेकर बनलो असतो.” असं राज ठाकरे म्हणाले.