www.24taas.com, वर्धा
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
5 सप्टेंबरला राज्याला पावसानं चांगलंच झोडपलं होतं. यावेळी अतिवृष्टीमुळं आर्वीमध्ये नदीला पूर येऊन तिघांचा बळी गेला होता. पूरामुळं तिघांचंही कुटुंब उघड्यावर आलं होतं.. त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश दिले. मात्र चोवीस तास उलटण्याआधी ही मदत प्रशासनानं परत घेतली. त्यामुळं मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. पूरग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाते. मृताच्या कुटुंबीयांना दोन वेगवेगळे धनादेश देणं गरजेचं होतं.
मात्र प्रशासनाच्या चुकीमुळं एकत्रित धनादेश दिल्यानं ते परत घेण्याची नामुष्की ओढवली.. याबाबत वृत्त प्रसारीत होताच मूग गिळून बसलेल्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली.. आता मृतांच्या नातेवाईकांना एक-एक लाख रुपयांचे दोन वेगवेगळे धनादेश देण्यात येणार आहेत.. मात्र प्रशासनाचा हा हलगर्जीपणा म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होतेय.