गंजलेल्या पाईपलाईनचा बोजवारा... अधिकारी झोपलेत का?

एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2013, 08:05 AM IST

www.24taas.com, ठाणे / नवी मुंबई
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.
ठाणे
ठाण्यात ड्रेनेज लाईनच्या कामामुळं भास्कर नगर इथं पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळं हजारो लीटर पाणी वाया गेलं. गेल्या दोन दिवसांपासून ही पाईपलाईन फुटलीय. मात्र, पालिकेचं याकडं लक्ष नाही. पाईपलाईन फुटल्याबाबत इथल्या नागरिकांनी पालिकेला कळवलं होतं. पण, दोन दिवस उलटले तरीही पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवसांत परिसरात हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली.
बदलापूर
तर बदलापूरच्या बारवी डॅममधून मुरबाड ‘एमआयडीसी’ ला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ८ ते १० ठिकाणी फुटल्यानं दररोज लाखो लीटर पाणी वाया जातंय. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हे पाणी वाया जात असूनही एमआयडीसी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. १० वर्षांपूर्वी टाकलेली ही १६ किमीची पाईपलाईन अनेक ठिकाणी गंजली असून आता तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केलीय.

नवी मुंबई
तर दुसरीकडे नवी मुंबईतही अशाच प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरु आहे. नवी मुंबईच्या ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी ठिक-ठिकाणी फुटलीय. या फोडलेल्या जलवाहिनीतून आंघोळीसाठी तसंच कपडे धुण्यासाठी पाणी चोरलं जात असल्याचं समोर येतंय. चार ठिकाणी या जलवाहिनीला मोठी भोकं पडली असून यातून हजारो लीटर पाणी वाया जातंय. पोलिसांनी आत्तापर्यंत तीन लोकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असल्या तरी कारवाई नावापुरती होत असल्याचं दिसून येतंय.