www.24tass.com,झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडियन ऑक्झिलेट कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. कंपनीवर धडक मारून गेट बंद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या ४८ कार्यकर्त्यांना अटक केली. तर ५० जणांवर गुन्हे दाखल केले. कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कंपनी मालकाने पोलिसांमार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले गेट बंद आंदोलन मोडून काढले. पोलिसांनी मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर, खेडच्या नगराध्यक्षा सौ. गौरी पुळेकर यांच्यासह सुमारे ४८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कंपनीत २००२ मध्ये तीनशेहून अधिक कामगार होते. त्यापैकी काही ना काही कारणांवरून सतत कामगारांना काढण्यात आल्याने सध्या कंपनीत सुमारे दीडशे कामगार राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यापैकी पाच कामगारांवर डिझेल चोरीचा ठपका ठेवत त्यांच्या पगारातून काही रक्कम कापण्यास कंपनीने सुरवात केली. याबाबत तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते कंपनीवर धडकले होते.
वारंवार चर्चेचा प्रयत्न करूनही कंपनीने नकार दिला. चर्चेला तयार नसल्याने खेड पोलिसांनी या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कामगार आयुक्तांनाही बोलाविण्यात आले; मात्र मालकाने कामगार आयुक्तांच्या तोडग्यालाही केराची टोपली दाखवली. त्यामुळे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘गेट बंद`चा इशारा मनसेने कंपनीला दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने मात्र मनसेला कंपनीच्या आवारापासून शंभर मीटरच्या आत प्रवेशास मज्जाव केला होता.
मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गुणदे फाटा येथे एकत्र येत घोषणाबाजी करत कंपनीपासून शंभर मीटर अंतरावर थांबले होते. आंदोलनाला सुरवात होऊन तीन तास उलटले, तरी कंपनी मालक चर्चा करण्यास तयार नसल्याने शेवटी आंदोलकांनी शंभर मीटरची सीमारेषा ओलांडली. त्यावेळी शंभर ते दीडशे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. न्यायालयाचा अवमान केल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये मनसे कोकण संघटक वैभव खेडेकर, विश्वाास मुधोळे, खेडच्या नगराध्यक्ष सौ. गौरी पुळेकर, उपनगराध्यक्ष किशोर चिखले, बाळा सासने, लोटे विभागप्रमुख दिलीप महाडिक, उपतालुकाप्रमुख राजू घाग, तालुकाप्रमुख शरद शिर्के, नाना चाळके, सुधीर महाडिक आदींचा सहभाग होता.
खेडमध्ये बंद
वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना लोटे येथे अटक झाल्याचे समजताच खेडमध्ये मनसेप्रणित व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद केली. या कार्यकर्त्यांनी इतर व्यापाऱ्यांवर मात्र कोणतीही सक्ती केली नाही. बाजारपेठेत सायंकाळी साडेचार वाजल्यापासून उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.
आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करत असताना मालकाने आंदोलन दडपण्याचा पोलिसांमार्फत केलेला प्रयत्न मनसे सफल होऊ देणार नाही. यापुढील आंदोलनाची वेगळी दिशा ठरवून मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा वैभव खेडकर यांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.