www.24taas.com, वृत्तसंस्था, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका मानलेल्या भावानं आत्महत्या केलीय. आत्महत्ये अगोदर त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला – प्रेयसीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, आशेला गावात राहणाऱ्या ३४ वर्षांच्या गीताचं (बदललेलं नाव) पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, तिचं हे लग्न फार काळ तग धरू शकलं नाही. त्यानंतर ती पतीपासून वेगळं राहत होती.
दरम्यान, सीमाचं शेजारीच राहणाऱ्या २४ वर्षीय दीपक मारुती पवार या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. समाजासमोर दोघंही एकमेकांना मानलेले भाऊ-बहिण दाखवत होते. परंतु, दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याचं अनेकांना संशय होता. त्यातच काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत होते.
शुक्रवारी दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान, गीता आणि दीपकमध्ये काही कारणास्तव जोरात भांडण झालं. त्यामुळे रागाच्या भरात दीपकनं गीतावर धारदार हत्यारानं अनेक वार केले. गीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची आरोळी ऐकताच शेजारी राहणारे लोक तिच्या घरात दाखल झाले. तेव्हा घाबरुन दीपक तिथून फरार झाला.
यानंतर दीपकला पोलिसांची भीती सतावू लागल्यानं त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. शुक्रवारी रात्री उशीरा डोंबिवली आणि कोपर स्टेशन मार्गावर चालत्या रेल्वेमधून उडी मारून त्यानं आत्महत्या केली. प्रेमिका गीता हिला कल्याणच्या फोर्टीज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.