www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.
ठाण्यात ३०० ते ४०० रुपये डझन भावात हापूस आंबा मिळतोय. त्यामुळे मागणीही वाढलीय आणि ग्राहकही खुश आहेत. हापूस आंब्याच्या नावाने तोंडाला पाणी सुटते पण खिशाला परवडत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड व्हायचा. यंदा मात्र परिस्थिती बदलीये.
कोकणचा राजा समजल्या जाणा-या हापूस आंब्यावर येत्या 1 मे पासून युरोपमध्ये बंदी घालण्यात आलीय. संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय आंब्यावरील बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनियननं स्पष्ट केलंय. त्याचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र फळांच्या राजाची ही शान घसरवण्यात सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत ठरतेय. त्याचक आंब्याचे भाव कोसळल्याने आंबा व्यापाऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
आंबा अमेरिकेत पाठवायचा असेल तर इरॉडीएशन चाचणीसाठी तो नाशिकला पाठवावा लागतो. तर जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात आंबा पाठवायचा असेल तर त्याच्यावर व्हेपर हीट ट्रीटमेंट करावी लागते. ही ट्रीटमेंट होते वाशीला.. म्हणजे कोकणात पिकणा-या आंब्याच्या चाचण्या होतात नाशिक आणि वाशीला. त्यामुळे कोकणच्या राजाला घर सोडून दारोदारी फिरावं लागतं. पण सरकारची इच्छाशक्ती असेल तर हा प्रश्न तातडीनं सोडवणं शक्य आहे असं व्यापाऱ्यांना वाटतय. त्यासाठी बागायतदार, व्यापारी, तज्ज्ञ यांची एक समिती स्थापन करण्य़ाची मागणी होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.