हुंडा मागणारा नवरेदव लग्नमंडपातून तुरुंगात

डोंबिवलीत एका लग्नमंडपात अजब घटना घडली. हुंडा मागणा-या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला पडण्याऐवजी चक्क चोप मिळाला. त्यानंतर मुलीच्या धाडसामुळे त्याला थेट तुरुंगात जावे लागले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 17, 2012, 08:11 AM IST

www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीत एका लग्नमंडपात अजब घटना घडली. हुंडा मागणा-या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला पडण्याऐवजी चक्क चोप मिळाला. त्यानंतर मुलीच्या धाडसामुळे त्याला थेट तुरुंगात जावे लागले.
डोंबिवलीच्या गणेशनगर मध्ये राहणा-या एका तरूणीचा बदलापूर मध्ये राहणा-या सॉफ्टवेर इंजिनिअर प्रवीण बने बरोबर रविरावारी विष्णूनगर परिसरातील ज्ञानेश्वर कार्यालय इथं विवाह होणार होता. दोघांचं एकमेकांवर दीड वर्षांपासून प्रेम होतं. विशेष म्हणजे दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण ऐन लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढत असताना नवरदेव 2 लाखांच्या हुंड्यासाठी अडून बसला.
नवरीकडच्यांनी नवरदेवाची खूप समजूत घातली. मात्र हुंडा घेतल्याशिवाय लग्नाला उभा राहणार नाही, अशी भूमिका त्यानं घेतली. अखेर संयम सुटलेल्या नवरीकडच्या मंडळींनी नवरदेवाला चोप देत त्याची वरात पोलीस ठाण्यापर्यंत काढली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
सध्या लग्नसराईचा मुहूर्त सर्वत्र धूमधडाक्यात सुरू असताना आज येथील एका लग्न सोहळ्यात नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधुपक्षाच्या मंडळींकडे दोन लाखांचा हुंडा मागण्याची घटना घडली. हुंडा दिल्याशिवाय लग्न करणार नाही, असा पवित्रा नवरदेवाने घेतल्यावर नववधूनेही धाडसाने विवाह करण्यास स्पष्ट नकार देत थेट पोलीस ठाणे गाठून नवरोबाविरोधात तक्रार दाखल केली. अखेर, हुंड्याच्या लालसेपायी नवरदेवावर मात्र गजाआड व्हावे लागण्याची नामुश्की ओढवली आहे.

रीतीरिवाजाप्रमाणे नवरदेवाला एक तोळ्याची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी आणि १५ हजार रुपये पोषाखासाठी अशी व्यवहाराची बोलणीही पक्की झाली. असे असताना नवरदेव सकाळी आरतीला न आल्याने वधुपक्षाच्या मंडळींनी दूरध्वनीवर नवरदेव प्रवीणशी संपर्क केला. वधू अमृता आणि तिचे वडील विजय साळुंखे यांनीही त्याला संपर्क केला. लग्नमंडपात आल्यावर संगणक अभियंता असलेल्या प्रवीणने थेट दोन लाख रुपये हुंड्याची मागणी केली. हुंडा दिल्यावरच बोहल्यावर चढीन, अशी भूमिका घेतली. हुंड्याच्या मागणीने हादरलेल्या वधुपक्षाच्या मंडळींकडून प्रवीणला समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो हटून बसला होता.