www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेवढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.
हौसेला मोल नसते... गाडी घ्यायची हौस फिटली तर आवडीच्या नंबरसाठी आटापिटा सुरू होतो? ९ चा आकडा हा शुभ मानला जातो म्हणून त्या नंबरची प्लेट हवी. ज्या आकड्यांची बेरीज ९ होते असे नंबर, जन्मतारखेचा नंबर, जुनी गाडी शुभ होती म्हणून तिचाच नंबर, जोतिषाने सांगितलेला शुभ नंबर, तर सर्वांच्या लक्षात राहील असा प्रेस्टीज वाढवणारा १ नंबर आपल्या गाडीला मिळावा, यासाठी चढाओढ सुरु झाली. आवडीच्या आणि शुभ नंबरसाठी कितीही रक्कम मोजण्याची तयारी होती.
गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये सर्वात महागडा नंबर आहे तो १ नंबर... १ नंबर पाहिजे तर तुम्हाला तब्बल चार लाख मोजावे लागणार, चालू सिरीजमधला हा नंबर कोणीतरी घेतला किंवा गेला तर मग दुसऱ्या सिरीजमध्ये म्हणजेच दुचाकी सिरीजमध्ये आपल्याला हा नंबर घ्यायचा असेल तर या नंबरची तिप्पट किंमत म्हणजेच १२ लाख रूपये मोजावे लागतात... आणि आश्चर्य म्हणजे १२ लाख मोजून नंबर विकत घेणारे महाभागही आहेत. दुचाकी गाडीसाठी १ नंबर पाहिजे असेल तर दुचाकी गाडी एवढीच किंमत म्हणजे ५० हजार रूपये मोजावे लागतात.
कधी कधी १ नंबरसाठी दोन किंवा जास्त व्यक्ती इच्छुक असतात, त्यावेळी लॉटरी पद्धतीने लिलाव केला जातो. म्हणजेच एका बंद लिफाफ्यात चार लाखांपेक्षा आणखी काही जास्त किंमतीचा डीडी बंद लिफाफ्यात टाकावा लागतो. नंतर हे लिफाफे सगळ्यांच्या समोर फोडण्यात येतात. ज्यांनी जास्त किमतींचा डीडी भरलाय, त्याला तो नंबर दिला जातो. लोकांच्या या हौसेमुळे प्रादेशिक परिवहन विभागाची तिजोरी मात्र भरतेय. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला यातून दरवर्षी जवळपास ५ कोटी रूपयांचा फायदा होतो.
केवळ आवडीच्या आणि शुभ नंबरसाठी चार लाख रूपये मोजणारांचीही कमालच आहे. एवढ्या किंमतीत तर एखादा सामान्य नागरिक त्याच्या स्वप्नातील गाडी घेऊ शकतो. लोकांच्या या नंबर प्रेमामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन ठाणे विभागाची मात्र चांदी होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.