www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ऑगस्ट महिना ठाणेकरांसाठी मोठ्या पर्वणीचा महिना ठरणार आहे... कारण तब्बल 6 ठाणेकर नेत्यांचे वाढदिवस या महिन्यात आहेत आणि गोकुळ अष्टमीही... त्यामुळे ठाणेकरांचा हा महिना एकदम मस्त जाणार हे नक्की आहे...
ऑगस्ट महिन्यात ठाणेकरांसाठी पर्वणी... एका महिन्यात तब्बल 6 नेत्यांचे हॅपी बर्थडे...
बॅनर्समुळे वाढणार ठाण्याची शोभा... दहिहंडीमुळे ठाणेकरांची मज्जाच मज्जा... होय... हे अगदी खरं आहे... ऑगस्ट महिन्यात आहेत ६ ठाणेकर नेत्यांचे वाढदिवस...
1 ऑगस्ट - शिवसेना आमदार राजन विचारे
1 ऑगस्ट - काँग्रेस नगरसेवक नारायण पवार
4 ऑगस्ट - महापौर हरिश्चंद्र पाटील
5 ऑगस्ट - राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड
15 ऑगस्ट - काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर
15 ऑगस्ट - स्थायी समितीचे अध्यक्ष रविंद्र फाटक
आता तुम्ही विचाराल, नेत्यांचे वाढदिवस आहेत, तर पर्वणी कसली? अहो, असं काय करता... आता तुम्हाला चौकाचौकात देखणे बॅनर्स बघायला मिळतील की! मज्जा आहे तुमची... नेत्यांचे हसरे चेहरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे शेकड्यानं फोटो असलेले हे भलेमोठे बॅनर्स कशी आपल्या शहराची शोभा वाढवतात ते बघालच तुम्ही...
तसंही, रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे तुम्ही गाड्या फास्ट चालवत नाहीच. मग जाता-येता तुम्हाला या सुशोभित बॅनर्सचा आनंद लुटता येईलच. 12 रुपयांत, 5 रुपयांत किंवा 1 रुपयांत पोटभर जेवण देऊन तुम्हाला या नेत्यांच्या वाढदिवसांची पार्टी करता येईलच... भ्रष्टाचार, महागाई, महापालिकेचा भोंगळ कारभार हे सगळं-सगळं तुम्हाला विसरायला लावतील तुम्हाला हे बॅनर्स. पण काही ठाणेकरांना याचं काहीच कौतुक नाही, असं दिसतंय... आम्ही या आनंदपर्वणीबाबत विचारलं, तर त्यांनी चक्क नाराजीचा सूर लावला...
आता हे मोजके ठाणेकर सोडले, तर बाकीच्यांची चंगळच होणार आहे या महिन्यात. पण तुमचा आनंदोत्सव इथंच थांबणार नाहीये. कारण ऑगस्ट महिना संपता-संपता 29 तारखेला येतोय गोपाळकाला...
चौकाचौकात मोठमोठे स्टेज उभारून कोट्यवधीचं बक्षीस लावलेल्या दहिहंड्या बांधल्या जातील... कानठळ्या बसवणा-या डीजेच्या तालावर धुंद होताना आपण ट्रॅफिकमध्ये अडकलोय, हे विसरूनच जाल तुम्ही. पाऊस नाहीच आला त्या दिवशी, तर टँकरनं उडवलेलं पाणी तुम्हाला दुष्काळाचा विसर पाडेल...
या नेत्यांनी आपलं आयुष्य गेल्या 5 वर्षांत किती सुखकर केलंय... त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे... रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये उभं राहून का होईना, पण त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आपण केलंच पाहिजे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.