www.24taas.com, झी मीडिया, रोहा
दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मनस्वी नाक्ती असं या मुलीचं नाव असून स्थानिक नागरिकांनी तिला अपघातग्रस्त डब्यातून बाहेर काढलं. आता मनस्वीची प्रकृती स्थिर आहे. पण तिने या अपघातात आई गमावली आहे. तिच्या दोन बहिणींचाही अजून पत्ता लागलेला नाही. या घटनेमुळं देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय.
तर या भीषण अपघातातील मृतांचा आकडा २५ वर पोहोचला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातानंतर तब्बल दोन तासांनी मदतकार्य सुरू झाल्याचं सांगत गाडीतील प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघात दुर्गम ठिकाणी घडल्यानं परिस्थिती अधिकच नाजूक बनली आहे.
हा अपघात दुर्गम ठिकाणी झाल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत. जेसीबीनं वाट बनवून गाडीपर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे. रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, उदय सामंत, जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही जखमींची विचारपूस केली.
स्थानिक लोक सर्वात आधी मदतीसाठी धावून आले. बाजूच्या भिसे, रेबोली आणि मेढा आधी गावातील लोकांनी जखमींना मदत केली. त्यांनी काही मृतदेहही बाहेर काढले. त्यामुळं काही प्रमाणात अपघातग्रस्तांना दिलासा मिळाला. त्यानंतर पनवेलहून एसटीच्या दहा गाड्या सोडण्यात आल्या तर कुर्ला आणि कल्याणहून एक्सिडन्ट रिलीफ गाडीही रवाना करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.