www.24taas.com, झी मीडिया, शहापूर
शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.
वाफे, खुटघर, गोठेघर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली. त्यातला २९ पैकी २१ सदस्यहे मनसे पॅनलेचे निवडून आले आहेत. त्यातल्या गोठेघर ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी १० जागा मनसेनं पटकावल्या तर १ जागा काँग्रेसला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला आपलं खातंही उघडता आलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलच्या काही सदस्यांनी दोन महिन्यांपूर्वी मनसेत प्रवेश केला होता. त्याचाही फायदा मनसेला झाल्याचं बोललं जातंय. शहापूर ग्रामपंचायत आणि पंचायतसमिती ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. आगामी काळात शहापूर नगरपालिका होण्याची शक्यता वर्तविली जातेय. त्यामुळं गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतीचंही महत्त्व वाढेल. एकूणच मनसेलाही याचा फायदा होईल, असं दिसंतय.
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या लोहा नगरपालिका निवडणुकीत मुसंडी मारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाजी मारली. माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या कार्यकर्त्यांनी यश खेचून आणलं. अजित पवार यांनी प्रचारासाठी सभा घेतली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
लोहा नगरपालिका निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ९ जागा जिंकत मनसेनं स्पष्ट बहुमत मिळवलं. काँग्रेसने सात जागांवर विजय मिळवला आहे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.