www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकियानं आणलीय सध्याची सर्वात ‘बेस्ट डील’. मोबाईल जगतात सर्वात टिकावून मोबाईल निर्माण करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख आहे. याच कंपनीचा ‘नोकिया १०६’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केलाय. केवळ १,३९९ रुपयांना उपलब्ध असलेल्या या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकदा या मोबाईलची बॅटरी चार्ज केल्यानंतर ही बॅटरी स्टँडबाय अवस्थेत तब्बल ३५ दिवसांपर्यंत काम करू शकते.
हा फोन काळा, लाल आणि पांढरा अशा तीन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. नोकियाच्या ऑनलाईन स्टोअरवरही उपलब्ध असलेला हा फोन खरेदी केल्यावर फक्त पाच दिवसात ग्राहकांच्या हातात पडेल, असं आश्वासन देण्यात आलंय. ‘नोकिया १०६’ चा डिस्प्ले १.८ इंच रूंदीचा असून त्याचं पिक्सेल रिझोल्यूशन १२८ X १६० पिक्सल आहे तर पिक्सल डेन्सिटी ११४ पिक्सल प्रति इंच आहे.
फक्त एकच सिम कार्ड वापरता येणारा हा फोन टू जी कनेक्टिविटीवर चालतो तसंच डस्ट आणि स्प्लॅश प्रूफ कीपॅड हे या फोनचं महत्वाचं वैशिष्ट्य... म्हणजे कसाही वापर केला तरी फोनला काही होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये अर्थातच एक्स्टर्नल मेमरी सपोर्ट नाही. या हँडसेटमध्ये ५०० फोन नंबर सेव्ह राहू शकतात. तसंच ३२ पॉलिफोनिक रिंगटोन बिल्ट इन आहेत. ‘नोकिया १०६’ ची बॅटरी ८००mAh क्षमतेची असून त्यामुळे दहा तासांपर्यंतचा टॉक टाईम उपलब्ध होऊ शकतो, तर स्टँडबाय टाईम म्हणजे फोन न वापरताही त्याची बॅटरी ८४० तास म्हणजे तब्बल ३५ दिवस राहू शकतो. केवळ ७४ ग्रॅम वजनाचा ‘नोकिया १०६’ फोनला ३.५ मिमी ऑडिओ जॅक, एफ एम रेडियो, डिजिटल क्लॉक, कॅलक्युलेटर, फ्लॅश लाईट, कॅलेंडर, स्पिकिंग क्लॉक, अलार्म क्लॉक अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. नोकियाच्या सध्या बाजारात असलेल्या ‘नोकिया १०५’ या फोनसारखाच हा फोन आहे, फक्त ‘नोकिया १०६’ची स्क्रीन साईज थोडी मोठी आहे.
‘बेसिक फोन’मध्ये नोकियाचा हा फोन म्हणजे ‘बेस्ट डील’चं आहे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.