'स्मार्टफोन' अॅप्स... राजकीय पक्षांचा ध्यास!

लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 7, 2014, 12:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.
आपल्या देशात १० टक्क्यांपेक्षा कमी लोक स्मार्टफोनचा वापर करत असले तरी राजकीय पक्षांनी या स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘अॅप्स’ची मदत घेण्याचं ठरवलंय. या अॅप्सच्या साहाय्यानं तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा या पक्षांचा मानस आहे. या अॅप्ससह १८ ते २३ वयोगटातील नवख्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या राजकीय पक्षांचा असेल.
राजकीय क्षेत्रात मातब्बर झालेल्या भाजप, काँग्रेस पक्षापासून ते नव्या कोऱ्या आम आदमी पार्टीपर्यंत सगळेच पक्ष स्मार्टफोन अॅप्सच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत.
भाजपनं आपलं ‘इंडिया २७२+’ हे मोबाईल अॅप्लिकेशन नव्या वर्षाच्या मुहूर्तावर लॉन्च केलंय. तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस लवकरच आपापले अॅप्लिकेशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. या अॅप्सच्या साहाय्यानं मतदारांना आकर्षित करणं, कार्यकर्त्यांना आपले विचार मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, निवडणुकीविषयी माहिती आणि बातम्या शेअर करणं... या सगळ्या गोष्टी शक्य होतील असं तज्ज्ञांना वाटतंय.
भाजपचं ‘इंडिया २७२+’ हे मोबाईल अॅप्लिकेशन आत्तापर्यंत जवळजवळ १०,००० अँन्ड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सनं डाऊनलोड केलंय. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं प्रत्येक भाषण आणि वक्तव्या या अॅपवर फिरतंय. तर लवकरच काँग्रेसचं ‘विथ काँग्रेस’ हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च होणार आहे. ‘आम आदमी पार्टी’नं मात्र आपल्या अॅप्लिकेशनचं नाव ठरवलेलं नाही. परंतु या अॅप्लिकेशनवर मतदार, उमेदवार, लोकसभेचा इतिहास आणि निवडणुकीविषयी इतर माहिती मतदारांना मिळणार आहे.
यामुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर न्यू जनरेशनची भाषा बोलण्याची गरज भासू लागलीय, हे स्पष्ट झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.