गुगल मॅप्स आता ‘थ्रीडी’मध्ये...

गुगल मॅप्सनं ‘थ्रीडी मॅप्स’ची सुविधा सुरू करून सगळ्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आता, तुम्हाला तुमचं घर, एखादी बिल्डिंग किंवा आणखी एखादं ठिकाण नव्या गुगल मॅपच्या साहाय्यानं थ्री डी स्वरुपात पाहता येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुगल मॅप्सनं ‘थ्रीडी मॅप्स’ची सुविधा सुरू करून सगळ्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आता, तुम्हाला तुमचं घर, एखादी बिल्डिंग किंवा आणखी एखादं ठिकाण नव्या गुगल मॅपच्या साहाय्यानं थ्री डी स्वरुपात पाहता येणार आहे.
आठ वर्षांपूर्वी गुगलनं ‘मॅप’च्या दुनियेत पाऊल टाकलं. या काळात गुगलनं आपल्या प्रत्येक सुविधेमध्ये काही ना काही बदल केले. आता गुगलनं ‘मॅप’ म्हणजे जगाचा नकाशा दर्शविणाऱ्या सुविधेमध्ये अमुलाग्र बदल केलेत.

काय केलेत बदल
 गुगल मॅप आता तुम्हाला थ्रीडी स्वरुपात दिसू शकेल, हा यातील सर्वात महत्तवाचा मुद्दा
 प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र मॅप , गुगलच्या मॅपिंग सर्व्हिसमधील सॅटेलाइट इमेजपासून इनडोअर फोटोपर्यंत सर्व गोष्टी एकत्रित देताना सोपे आणि सुटसुटीत करण्यात आलंय.
 नव्या प्रणालीमध्ये युजरने मॅप सर्व्हिस सुरू केल्यावर सर्वप्रथम त्याच्या नेहमीच्या सर्च केलेल्या गोष्टी उदा . तुमचे घर , रेस्टॉरंट , विविध ठिकाणे याठिकाणी दिसतील . गुगल सर्च , हिस्टरी , गुगल प्लस आणि जीमेलमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे या गोष्टी दाखविल्या जातील.
 पूर्वी नावाशिवाय दिसणारी लोकेशन्स ( पिन्स ) आता वगळण्यात आली असून सर्च केल्यानंतर येणाऱ्या आघाडीच्या सर्चची विस्तृत माहिती आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी दिसणार आहे .
 तुमच्या मित्रांनी ‘त्या’ ठिकाणाला यापूर्वी भेट दिली असेल तर त्यांचा सल्लादेखील नव्या गुगल मॅपमध्ये लक्षात घेतला जाणार आहे .
 संबंधित ठिकाणी जाण्याचा मार्ग सांगतानाच सोबत त्या ठिकाणचे उपलब्ध असलेले फोटोही या ठिकाणी दिसणार आहे. उदा. सीएसटीकडून ताज हॉटेलकडे जाण्याचा मार्ग सर्च केल्यावर हॉटेल बिल्डिंगसोबतच आतील फोटो आणि ३६० अंशातील व्ह्यूदेखील दिसेल
 नव्या प्रणालीमध्ये एखाद्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते दिसणार असून त्यात छोट्या रस्त्यांचाही समावेश असेल. तसेच सर्च करताना संबंधित ठिकाणासारखी इतर ठिकाणेही सर्चमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
 सर्च केलेल्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीचे विवरणही नव्या गुगल मॅपमध्ये देण्यात आले आहे . त्यात आगामी तीन दिवसांच्या वेळापत्रकाचाही समावेश करण्यात आला आहे .
 नव्या मॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ३ डी इमेज दिसणार आहेत . त्यामुळे एखाद्या शहराचा पूर्ण नकाशा आणि झूम केल्यावर त्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो यात दिसणार आहेत.
 झूम इन करतानाच गुगलने झूम आऊटची सुविधाही देऊ केली आहे. या आधारे अवकाशात जाऊन पृथ्वी , आसपासचे ग्रह - तारे , सूर्य उगवताना आणि मावळतानाची परिस्थितीचा आनंद आता घेता येणार आहे.
सध्या तरी सर्वसामान्यांसाठी गुगलने ही सुविधा खुली केलेली नसली तरी maps.google.com/preview या लिंकवर जाऊन स्वतःला इन्व्हाइट पाठवून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.