www.24taas.com, मुंबई
आकाश पाठोपाठ खास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला ‘पृथ्वी’ टॅबलेट बाजारात दाखल झालाय. या टॅबलेटसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेनंही हातभार लावलाय.
ओपनसोर्सवर आधारीत या टॅबलेटमध्ये सेल्फ लर्निंग सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ही सर्व सॉफ्टवेअर्स होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेने तयार केलेली आहेत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम असलेला हा पहिला स्वस्त टॅबलेट आहे. याचं संपर्ण डिझाइन आणि उत्पादन भारतात करण्यात आले आहे. या टॅबलेटमध्ये २३ भारतीय भाषांसह एकूण८५ भाषांचा समावेश आहे . यात मराठी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, अरेबिक, उर्दू, झुलू, गुजराती, हिंदी इत्यादी भाषांचा समावेश आहे. हा टॅबलेट ओपनसोर्स असल्यामुळे या फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आलेले कोणतेही अॅप्लिकेशन यामध्ये आपल्याला लोड करता येऊ शकणार आहेत . विद्यार्थ्यांना वापरता यावा यासाठीतयार करण्यात आलेल्या या खास टॅबलेटमध्ये भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जीवशास्त्र , खगोलशास्त्र , भूगोल ,गणित , अलजेब्रा , कॅक्युलस , भूमिती , औषधशास्त्र आदी विषयांचे सेल्फ लर्निंग सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचेस्वतःचे नोट्सही तयार करता येतील. तसंच पुस्तकेही डाऊनलोड करता येणार आहेत. हा टॅबलेट ओपनसोर्सवर आधारीत असल्यामुळे यात सुमारे ३० लाख पुस्तकं आणि एनस्लायक्लोपिडीया, क्लास रूमव्हिडीओज, व्हर्च्यअल लॅब फॉर सायन्स असे विविध विषयांचा संग्रह उपलब्ध आहे.
सात इंचाची स्क्रिन असलेल्या या टॅबलेटमध्ये लिनक्स ऑपरेटींग सिस्टिम वापरण्यात आलीय. ८०० मेगाहार्टज प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅमची सुविधा पृथ्वीमध्ये देण्यात आलीय. एक जीबी फ्लॅश स्टोअरेजची सुविधा ३२ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल आहे. याशिवाय थ्रीजी डोंगल सपोर्ट, वाय - फाय आयईईई, अँड्रॉइड अॅप्लिकेशन, इंटरनेट ब्राऊजर, ओपन ऑफिस, मीडिया प्लेअर, ई - बुक रिडर इत्यादी सुविधा या छोट्याशा टॅबलेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेत.