www.24taas.com, कोलंबो
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या सुपर-8मध्ये ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय. मात्र, या मॅचच्या अगोदर भारताचा सलामीचा बॅटसमन विरेंद्र सेहवाग याच्या बोटाला जखम झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
आज तब्बल तीन तास चाललेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये सेहवागनं बॅटींग टाळली. त्याच्या बोटाला झालेली जखम किती गंभीर आहे याबद्दल नेमकी माहिती समजली नसली तरी इरफान पठाणला या प्रॅक्टीस मॅचमध्ये सलामीसाठी बॅटींगला येताना पाहून सेहवागच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार, हा सीनियर बॅटसमन एकदम ठीक असून सध्या त्याला थोड्या काळासाठी विश्रांती दिली गेली होती, प्रॅक्टीस मॅचमध्ये त्याच्या बोटाची जखम आणखीन गंभीर रुप धारण करू नये, यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचं कळतंय.
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये भारताच्या बॉलिंगची कमान केवळ पाच बॉलर्सनं सांभाळली होती. पण, हा निर्णय थोडा चुकला होता. धोनीला सात बॉलर्सच्या साहाय्यानं मैदानावर उतरताना नेहमीच बरं वाटतं... कदाचित, यावेळीही तो आपल्या पूर्वीच्याच निर्णय पुन्हा घेऊ शकेल.