www.24taas.com, कोलंबो
टी-२० वर्ल्डकपमधील दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. भारताने सुपर एटमध्ये यापूर्वीच धडक मारली आहे. यामुळे कॅप्टन धोनीला टीममध्ये काही बदल करण्याची संधी आहे. इंग्लंडविरूद्धच्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केले जातील असे संकेतही धोनीने दिले आहेत.
अफगाणिस्ताविरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. ना ओपनर्स चालले ना बॉलर्स प्रभावी ठरले. म्हणूनच आता गतविजेत्या इंग्लंडबरोबर खेळताना कॅप्टन धोनीला विचारपूर्वक प्लेअर्सची निवड लागणार आहे. खासकरून बॉलिंग डिपार्टमेंट विक असल्याने धोनीला आता काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि तसे संकेतही धोनीने दिले आहेत. अफगाणिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये धोनी चारच बॉलर्स घेऊनच खेळला होता. यातील अनुभवी झहीर खान पूर्णपणे फ्लॉप ठरला. यामुळे कामचलाऊ बॉलर्सवर अतिरिक्त ताण पडला. बॉलर्सच्या प्रभावहिन कामगिरीमुळे नाही म्हणता अफगाणिस्तानसारख्या दुबळया टीमने तब्बल १३६ रन्सचा टप्पा गाठला. चार बॉलर्स घेऊन खेळताना एखादा बॉलर अपयशी ठरला तर कामचलाऊ बॉलरवर अतिरिक्त ताण येतो. म्हणूनच अनुभवी बॉलर्स आता चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे, असं धोनीनं म्हटलंय.
दरम्यान टीम इंडियाची आता खरी परिक्षा सुरू होणार आहे आणि भारत सुपर एटमध्ये दाखल झालाय. म्हणूनच इंग्लंडविरूद्धच्या या मॅचमध्ये धोनीला टीममध्ये बदल करण्याची ही संधी आहे. आता टीममध्ये केल्या जाणा-या बदलामुळे तरी कामगिरीमध्ये काही फरक पडतो का हे पहावं लागेल.