मुंबई : बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र, या टीममध्ये युवराज सिंग याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु ऑफ स्पिनर हरभज सिंग याने कमबॅक केले. टीमची घोषणा करताना युवीच्या नावाची चर्चाही झालेली नाही, अशी स्पष्ट कबुली निवड समितीचे मुख्य संदीप पाटील यांनी दिली.
विराट कोहलीवर कसोटीची तर महेंद्र सिंग धोनीवर एकदिवशीय सामन्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. भज्जीला स्थान देताना वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, प्रग्यान ओझा, युवराज सिंग यांना टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही. याबाबत संदीप पाटील यांनी सांगितले, कोणाबाबत चर्चा झाली हे सांगणे कठिण आहे. मात्र, कर्णधार आणि निवड समिती यांना जे खेळाडू योग्य वाटले त्यांच्याबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणालेत.
निवड समिती देशातील प्रत्येक खेळाडूचे प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे आमचा कोणाशी भावनात्मक संबंध नाही. आम्ही चांगले प्रदर्शन आणि चांगला फिटनेस असेल त्यावर भर देतो. मोहम्मद शमी सोडून बाकी सर्व खेळाडू फिट आहेत. शमी चार आठवड्यानंतर उपलब्ध होईल.
कोणत्याही सिनिअर खेळाडूने या दौऱ्यातून माघार घेतलेली नाही. त्याबाबत तसे काहीही सांगितलेले नाही. आमचे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. आमचेच नाही तर अन्य देशांचेही खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. आम्ही विचार केला असता तर दोन ते तीन खेळाडूंना विश्रांती दिली असती. मात्र, खेळाडूंचा आग्रह कायम होता. त्यामुळे आम्ही सर्व श्रेष्ठ टीमची निवड केली आहे.
कसोटी टीम ( विराट कोहली ) कर्णधार : मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरूण आरोन आणि इशांत शर्मा
वनडे टीम ( महेंद्र सिंग धोनी ) कर्णधार : रोहित शर्मा, अंजिक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडु, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.