नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी विजय हजारे चषक स्पर्धेत भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगची बॅट तळपली. त्याने या सामन्यात ४ षटकार आणि ८ चौकारांसह ९८ धावा ठोकल्या. युवराजच्या धडाकेबाज खेळीमुळे पंजाबने विजय हजारे चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
शुक्रवारी पंजाब आणि सर्व्हिसेस संघादरम्यान झालेल्या सामन्यात हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील पंजाबने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सर्व्हिसेस प्रथम फलंदाजी करताना ७ विकेटच्या मोबदल्यात ३२४ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल पंजाबने चांगली सुरुवात केली. युवराज सिंगने ८८ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकार ठोकताना ९८ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीमुळे पंजाबला विजयाचे लक्ष्य सहज गाठता आले.