कल्याणच्या प्रणवचा ६५२ धावांचा विश्व विक्रम

कल्याणच्या क्रिकेटच्या मैदानात आज चमत्कार पाहायला मिळाला.

Updated: Jan 4, 2016, 11:46 PM IST
कल्याणच्या प्रणवचा ६५२ धावांचा विश्व विक्रम title=

मुंबई : कल्याणच्या क्रिकेटच्या मैदानात आज चमत्कार पाहायला मिळाला. 199 बॉल्समध्ये नाबाद 652 धावांची विक्रमी खेळी कल्याणकरांना पाहायला मिळाली. हा नवा जागतिक विक्रम घडवलाय कल्याणच्या प्रणव धनावडे या 16 वर्षांच्या क्रिकेटपटूनं. प्रणवने आपल्या या विक्रमी इनिंगमध्ये 78 चौकार आणि तब्बल 30 उत्तुंग षटकार ठोकले. 

वायले नगर परिसरात युनियन क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवर सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एच.टी. भंडारी अंडर सिक्स्टीन क्रिकेट कप स्पर्धेत त्यानं हा रेकॉर्ड केला. यापूर्वी 1899 साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सनं 628 धावा केल्या होत्या. तर रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉ यानं काही वर्षांपूर्वी याच स्पर्धेत 546 धावांचा रेकॉर्ड केला होता. 

कल्याणच्या के.सी.गांधी शाळेत 10व्या इयत्तेत असलेल्या प्रणवनं हे रेकॉर्ड मोडले. आणि क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या रचली. तो तब्बल 5 तास मैदानावर तळ ठोकून होता. अद्यापही तो नॉटआउट असून त्याच्या संघाची धावसंख्या 956 इतकी झाली आहे. 

उद्या मॅचचा शेवटचा दिवस बाकी आहे. आज दिवसभर या मैदानावर केवळ धावांचा पाऊस पडला. प्रणवबरोबरच आकाश सिंग याने 173 आणि सिद्धेश पाटील याने 100 धावा ठोकत प्रणवला जोरदार साथ दिली.