मेघा कुचिक, मुंबई : पुरुषांचा कबड्डी वर्ल्ड कप धुमधडाक्यात आणि यशस्वीरीत्या पार पडला. एकंदरीतच प्रो-कबड्डीनंतर पुरुष कबड्डी खेळाला चांगले दिवस आले आणि पुरुष कबड्डीपटूंचं नशीबच पालटल्याचं दिसून येतंय. मात्र महिला कबड्डी खेळाडूंच्या वाट्याला इथेही उपेक्षाच पदरी आलीय.
पुरुषांचे प्रो-कबड्डीचे आतापर्यंत चार हंगाम खेळवण्यात आले. मात्र, अजूनही महिला संघांना प्रो-कबड्डी लीगमध्ये सामील करुन घेण्यात आलेलं नाही. नाही म्हणायला गेल्या हंगामात महिलांचे प्रायोगित तत्वावरचे सामने आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्याला ना फार महत्त्व मिळालं ना प्रसिद्धी...
प्रो-कबड्डीच्या यशाचा फायदा उठवत कबड्डी महासंघानं एका खासगी क्रीडा वाहिनाला हाताशी धरुन अहमदाबादमध्ये पुरुष कबड्डी वर्ल्ड कपचं यशस्वीरित्या आयोजनही केलं. विशेष म्हणजे, प्रो-कबड्डीमुळेच तब्बल नऊ वर्षांनंतर पुरुष कबड्डी वर्ल्ड कप आयोजित केला गेला. आता पुरुष कबड्डी वर्ल्ड कप सातत्यानं आयोजित करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मात्र, महिला कबड्डी अजूनही दुर्लक्षितच आहे.
2012 मध्ये पाटण्यात झालेला महिलांचा वर्ल्ड कप हा पहिला आणि एकुलता एक वर्ल्ड कप. यापुढेही महिला कबड्डी वर्ल्ड कप आयोजित केला जाईल की नाही याबाबत अनिश्चितताच आहे.
दरम्यान महिलांची आशियाई कबड्डी स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. तरीही लीग किंवा वर्ल्ड कपसारखा महत्त्वाचा दर्जा या स्पर्धेला नाही. महिलांसाठी प्रो-कबड्डी लवकरच सुरु होईल, असं आश्वासन दिलं जातंय खरं. मात्र प्रत्यक्षात त्यासाठीच्या हालचाली काही दिसत नाहीत. अनेक गुणवान महिला कबड्डीपटूंना संधीच मिळत नाही आहे. त्यामुळे महिला कबड्डीपटूंना अजूनही संघर्षच करावा लागतोय.