अमोल पेडणेकर, मुंबई : कबड्डी हा एकेकाळी पुरुषी वर्चस्वाचा खेळ होता... पण महिलाही कबड्डीत आता मागे राहिलेल्या नाहीत. आता महिलांनींही या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.
काही वर्षांपूर्वी कबड्डी या क्रीडा प्रकारात महिलांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके संघ होते. पण पारंपरिक खेळ असणाऱ्या कब्बडीचा इव्हेंट झाला आणि सोबत आली प्रसिद्धी... आता 'प्रो कबड्डी'मुळे महिलांचा या खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि महिलांच्या कबड्डी संघात वाढ झाली.
पूर्वी महिलांची कब्बडी स्पर्धेसाठी आयोजक मिळत नसत. परंतु आता मात्र आयोजकांनीही भरघोस बक्षिसांची लयलूट करत महिलांच्या कब्बडी सामने भरविण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे जिल्हा आणि राज्य पातळीवर देखील महिलांनी चांगलं यश मिळवलंय.
या खेळाला प्रसिद्धी मिळाली असली तरीही या खेळातली आव्हानंही तितकीच आहेत. महिला खेळाडूंना सरावासाठी पुरेशी सुरक्षित मैदानं नाहीत, तसंच अजून म्हणावी तितकी जागृतीही या खेळाबद्दल नाही. या खेळाकडे आणखी लक्ष दिलं तर भविष्यात चांगल्या महिला कबड्डीपटू घडतील आणि महिला कबड्डीला चेहराही मिळेल.