मुंबई: यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा 7 विकेटनं पराभव केला आहे.
टॉस जिंकून वेस्ट इंडिजनं भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं. यानंतर भारतानं 20 ओव्हरमध्ये 192 रन बनवल्या. भारताकडून या मॅचलाही विराट कोहलीची बॅट चालली. कोहलीनं 47 बॉलमध्ये 89 रनची खेळी केली.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारतानं आपल्या ओपनिंग बॅट्समन बदलले. शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला. अजिक्यनं 35 बॉलमध्ये 40 रन केल्या, तर रोहित शर्मालाही या मॅचमध्ये सूर गवसला. रोहितनं 31 बॉलमध्ये 43 रन केल्या.
त्यानंतर 193 रनचा पाठलाग करायला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. ज्या बॅट्समनचा भारताला सगळ्यात जास्त धोका वाटत होता, तो क्रिस गेल स्वस्तात माघारी परतला. पण त्यानंतर सिमन्स, जॉनसन चार्ल्स आणि आंद्रे रसेलनं वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला.
सिमन्सनं 51 बॉलमध्ये 83 रनची खेळी केली, तर जॉन्सन चार्ल्सनं 36 बॉलमध्ये 52 रन बनवल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या आंद्रे रसेलनं 20 बॉलमध्ये 43 रनची अफलातून खेळी केली.
या विजयानं वेस्ट इंडिज या टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यांचा मुकाबला आता इंग्लंडबरोबर 3 एप्रिलला कोलकत्याच्या इडन गार्डनवर होणार आहे.