विराट कोहली की ख्रिस गेल? कोण ठरणार अव्वल

मुंबई : ऑस्ट्रेलियाला हरवून टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पोहोचलेल्या भारताचा सामना होणार आहे वेस्ट इंडिज संघासोबत.

Updated: Mar 29, 2016, 01:49 PM IST
विराट कोहली की ख्रिस गेल? कोण ठरणार अव्वल title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाला हरवून टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पोहोचलेल्या भारताचा सामना होणार आहे वेस्ट इंडिज संघासोबत. ३१ मार्चला होणाऱ्या या सामन्यात सर्वांचं लक्ष असणार आहे ते विराट कोहली आणि ख्रिस गेलवर. आता हे दोन तगडे वीर आमने-सामने आल्यावर कोणते विक्रम प्रस्थापित करणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. 

गेलची फलंदाजी जेव्हा सुरू होते तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध गेलने नाबाद १०० धावा केल्या होत्या. तर टी-२० च्या तीन सामन्यांत त्याने आत्तापर्यंत एकूण १०४ धावा केल्या आहेत. एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

भारताविरुद्धही गेलचा विक्रम खूप मोठा आहे. भारताविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांत त्याने १५४ धावा केल्या आहेत. यापैकी २०१० साली ९८ धावा या त्याच्या सर्वाधिक धावा राहिल्या आहेत. मात्र वेस्ट इंडिजला या मालिकेतून बाहेर पडावे लागले होते.

विराटने मात्र या टी-२० विश्वचषकात ५ डावांत एकूण २२५ धावा केल्या आहेत. नाबाद ८२ हा त्याचा सर्वाधिक स्कोअर राहिला आहे. टी-२० प्रकारात सर्वात जास्त वेगाने १५०० धावा करण्याचा विक्रमही त्याने केलाय. आत्तापर्यंत खेळलेल्या ४२ सामन्यांत त्याने १५५२ धावा बनवल्या आहेत. यात १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

२०१६ साल कोहलीसाठी आशादायक ठरले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या दोन सामन्यांत त्याने एकदा अर्धशतक केले आहे. टी-२० मध्ये त्याने आजवर ३१ षटकार आणि १६२ चौकार ठोकले आहेत.