मेलबर्न : विराट कोहली वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला आहे, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याची कामगिरी प्रभावी ठरल्याचे मत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलंय.
द्रविडकडून विराटचं कौतूक
राहुल द्रविड म्हणाला, "आपल्या सगळ्यांची बुद्धी अल्पकाळापुरती मर्यादित आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये जबरदस्त खेळी केली होती. त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरीच प्रभावशाली ठरली आहे. एखाद्या भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियात जाऊन चांगली कामगिरी करून दाखविणे अवघड आहे. पण, विराटने चांगली कामगिरी करून दाखविली. तो उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकला नाही, हे दुर्दैव आहे.
पण, हाही खेळाचाच एक भाग आहे. उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्याचे दुःख मला जास्त झाले नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्यापेक्षा सरस खेळ केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण एकही विजय मिळवू शकलो नाही, हे कटुसत्य आहे."
सेमी फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विशाल आव्हान ठेवले असतानाही, कोहली अवघी एक रन काढून बाद झाला होता. यावरून त्याच्यावर प्रेक्षकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, द्रविडने कोहलीला पाठिंबा देत त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचे कौतुक केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.