अॅडलेड : टीम इंडिया उद्याच्या सामन्यासाठी जोरदार सराव करतेय, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आराम करणे पसंत केलंय. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत येत्या रविवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा खरा कस लागणार आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने जंक्शन ओव्हल मैदानावर बुधवारी जोरदार सराव केला.
मेलबर्नच्या सुप्रसिद्ध सेंट किल्डा रस्त्यावरून पुढे गेल्यावर कोपऱ्यावर जंक्शन ओव्हल मैदान येते. याच मैदानावर सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाने सराव केला आणि भारतीय संघ दुपारी सरावाला हजर झाला.
संघ व्यवस्थापनाने काही फलंदाजांच्या सरावाकडे बारकाईने लक्ष दिले. चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन मारला जात आहे का, याकडे लक्ष दिल जात होते. विराट कोहलीला बराच वेळ संजय बांगरने तसा सराव दिला. रोहित शर्मा आणि रहाणेने त्याच्या शेजारच्या नेटमध्ये फिरकी गोलंदाजींवर सराव केला.
मैदानाच्या मध्यभागी खुला सराव करताना भारतीय संघातील सर्व वेगवान गोलंदाज यॉर्कर टाकायचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळाने धोनी सरावाला आला आणि सरावाचा नूर त्याने बदलला. कल्पनेतील क्षेत्ररचना डोक्यात पक्की करून एका षटकात १५ धावा करायचे आव्हान त्याने जाहीर केले.
दोघांच्या जोड्या लावून प्रत्येक फलंदाज दोन तीन चेंडू खेळत होता. मोठा फटका मारायला जमले नाही, की धोनी दुसऱ्या फलंदाजाला संधी देत होता.
स्वत: धोनीने हेलिकॉप्टर शॉटचा जोरदार वापर करून वेगवान गोलंदाजांच्या यॉर्करला तोडीस तोड उत्तर दिले. धोनीच्या बरोबर रहाणे, रायडू आणि आश्विनने मोठ्या फटक्यांचा सराव केला. सर्व गोलंदाज जीव तोडून मारा करीत होते.
या सरावाच्या वेळी आश्विनला दुखापत झाली. आपटलेला चेंडू काहीसा उशिराने आल्याने आश्विन फिरून गेला तेव्हा चेंडू येऊन त्याच्या उजव्या कोपरावर आदळला. तो आश्विनचा गोलंदाजी टाकणारा हात असल्याने फिजिओ नितीन पटेल धावत आले आणि त्यांनी उपचार केले. वेदना कमी झाल्यावर आश्विनने फलंदाजीच्या सरावात परत भाग घेतला.
सरावाचा संपूर्ण काळ रवी शास्त्री आणि डंकन फ्लेचर बारीक लक्ष ठेवून होते. 'पुढील सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसमोर असल्याने भारतीय संघाला चांगल्या गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाचा सामना करीत धावा काढणे सोपे नसणार, "असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. 'त्यांच्या क्षेत्ररक्षणात चपळता आहे आणि चेंडूच्या फेकीत ताकद आहे.
जर खराब चेंडूंचा योग्य समाचार घेतला तर गोलंदाजांवर दडपण येऊ शकते आणि मग डेल स्टेन सारखा गोलंदाजही गडबडू शकतो. फक्त त्या निर्णायक क्षणी फटके मारता आले पाहिजेत,'असे मत तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
सरावानंतर बोलताना रवी शास्त्री यांनी, आजच्या तीन तासांच्या सरावानंतर भारतीय संघ उद्या विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. सर्व खेळाडू एकत्रितपणे कुठेतरी फिरायला जाणार आहेत, मात्र ते ठिकण गुप्त ठेवण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.