दुबई : भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत समावेश होणारा कुंबळे हा जगातील ७७वा खेळाडू आहे.
कुंबळे हा सध्या आयसीसीच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे. वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. त्यावेळी कुंबळेचा या यादीत समावेश करण्यात येणार असल्याचे, आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होणारा कुंबळे हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. यापूर्वी बिशनसिंह बेदी, कपिल देव आणि सुनील गावसकर यांचा यादीत समावेश आहे.
आयसीसीने कुंबळे याच्यासह बेटी विल्सन या महान महिला क्रिकेटपटूचाही या यादीत ७८ वा खेळाडू समावेश केला आहे. कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी मिळविले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनने ८०० बळी आणि शेन वॉर्नने ७०८ बळी- यांच्यानंतर कुंबळेचे सर्वाधिक बळी आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही ३३७ बळी मिळविलेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाकिस्तानविरुद्ध दहा बळी मिळविण्याची कामगिरीही कुंबळेने करून दाखविलेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.