कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने भारताचा उपकर्णधार विराट कोहलीला मागे टाकत वेगवान तीन हजार धावा पूर्ण कऱण्याचा विक्रम केलाय.
विराटने ७५ वनडेत तीन हजार धावांचा टप्पा गाठला होता. मात्र धवनने ७२ डावात हे शिखर सर केले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिखर फॉर्मसाठी झगडत होता. अखेर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्याला सूर गवसला. तिसऱ्य़ा सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले तर चौथ्या सामन्यात त्याने १२६ धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक होते.
सर्वाधिक वेगाने तीन हजार धावा करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या गार्डन ग्रीनिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांच्याशी बरोबरी केलीय. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्डस यांनी ६९ आणि दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने ५७ डावांत ही धावसंख्या गाठली होती.