शुभांगी पालवे, मुंबई : फक्त करिअर म्हणून खेळाकडे पाहण्याऐवजी आपल्या उत्तम आरोग्यासाठी तरी खेळाकडे पाहणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त केलंय 'सावरपाडा एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊतनं...
कॉमनवेल्थ, मॅरेथॉनमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कवितावर शुभेच्छांचा वर्षाव झाला... इथपर्यंत दाखल होण्यासाठी तिला जो खडतर प्रवास करावा लागला त्याचा बराचसा शीण तिच्या पदकांनी कमी केला. पण, या यशामुळे ती हुरळून गेलेली नाही... तिचे पाय अजूनही जमिनीवरच खूप मेहनत घेत आहेत.
लग्नानंतरही आपण आपल्या सरावात सातत्या राखल्याचं तिनं म्हटलंय. एप्रिल २०१३ मध्ये कविता महेश तुंगार यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर कविता खेळू शकेल का? परफॉर्मन्स कायम राहील का? अशा प्रश्नांना एका लहानशा खेडेगावातून आलेल्या कविताला सामोरं जावं लागलं, यात नवल नव्हतंच... लग्नानंतर परफॉर्मन्स काहिसा घसरलेलाही दिसत होता... एका वेळी तर तिनं खेळातून बाहेर पडण्याचाही विचार केला होता, असा धक्कादायक खुलासाही कवितानं या कार्यक्रमात केला... पण, सासरच्या मंडळींचा खास करून पतीचा पाठिंबा मिळाला... आणि कवितानं स्वत:ला पुन्हा एकदा सरावासाठी झोकून दिलं.
आपण आजही खडतर मेहनत घ्यायला तयार असल्याचं तिनं म्हटलंय. आठवड्याला २०० ते २५० किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करत स्वत:वर मेहनत घेत असल्याचं तिनं सांगितलं... जास्तीत जास्त अंतर पार करायचं असेल तर दिवसाला ३०-४० किलोमीटर धावायची प्रॅक्टिस ठेवावी लागते... इतकंच नाही तर आपण जेव्हा प्रॅक्टिससाठी बाहेर पडतो त्यावेळी पतीही गाडी घेऊन जीपीएस चालू करून आपल्यासोबत गाडीनं साथ देतात, असं तिनं मोठ्या अभिमानानं म्हटलं.
भारतासाठी पदक पटकावल्यानंतर सरकारकडून मिळालेल्या मदतीबद्दल तिला यावेळी प्रश्न विचारण्यात आला... अर्थात बरीचशी मदत झाल्याचं तिनं मान्य केलं...पण, जी मदत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्यावर मिळायला सुरुवात होते तीच मदत तालुका, जिल्हा पातळीवरच मिळाली तर आणखीन कितीतरी कविता राऊत त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतात, असा विश्वासही तिनं यावेळी व्यक्त केला.
तयारीसाठी १०० टक्के दिले असतील स्पर्धेच्या वेळी दडपण येत नाही... तुमचा आत्मविश्वास फुल ऑन असतो... पहिल्यांदा आपण काहीतरी करून दाखवावं आणि मग इतरांकडून अपेक्षा कराव्या असा मोलाचा सल्लाही कवितानं तरुणांना दिलाय.
सध्या 'ओएनजीसी'मध्ये कार्यरत असलेल्या कविताची पोस्टिंग देहरादूनला करण्यात आलीय. आपल्याप्रमाणेच ज्या मुलींना परिस्थितीची साथ मिळत नाही... प्रशिक्षणाचा अभाव आहे... अशा मुलींसाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा आहे. आणखीन एक तरी कविता राऊत घडवायचीय असा चंगच कवितानं बांधलाय... सैनिक नसतानाही आपण देशासाठी काहीतरी करतोय, याचा आनंद कविताच्या चेहऱ्यावर दिसतो.
'लोकसत्ता' आयोजित 'व्हिवा लाऊंज' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कविता मुंबईत दाखल झाली होती. नकारात्मक परिस्थिती समोर असताना सकारात्मकता कशी आत्मसात करावी याचं उदाहरण म्हणजे कविता राऊत असल्याचंच या कार्यक्रमात तिच्या बोलण्यातून दिसत होतं. २००९ मध्ये एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य आणि २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक कवितानं पटकावलं होतं. कॉमनवेल्थमध्ये मिल्खा सिंग यांच्यानंतर भारतासाठी पदक प्राप्त करणारी ती दुसरी भारतीय अॅथलिट आणि पहिला भारतीय महिला ठरली होती.