रिओत लिएंडर पेससाठी घरच नाही

रिओ ऑलिम्पिकचा थरार आजपासून सुरू होत आहे. पण रिओतील गैरसोयीमुळे भारतीय खेळाडूंच्या उत्साहावर पाणी पडत आहे. त्यापैकीच एक आहे टेनिसपटू लिएंडर पेस.  ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत लिएंडरला अजूनही घर मिळालेले नाही.

Updated: Aug 5, 2016, 04:21 PM IST
रिओत लिएंडर पेससाठी घरच नाही title=

रिओ डी जेनेरो : रिओ ऑलिम्पिकचा थरार आजपासून सुरू होत आहे. पण रिओतील गैरसोयीमुळे भारतीय खेळाडूंच्या उत्साहावर पाणी पडत आहे. त्यापैकीच एक आहे टेनिसपटू लिएंडर पेस.  ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत लिएंडरला अजूनही घर मिळालेले नाही.

भारतीय संघाला देण्यात आलेल्या घरात एकूण तीन खोल्या आहेत. त्यातील एक खोली रोहन बोपण्णाची तर दुसरी फिजिओथेरपिस्टची आहे. तिसरी खोली कर्णधार जीशानची आहे. याच खोलीत पेस तात्पुरता राहत असून स्वतःची खोली मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पेस इटलीमध्ये चॅलेंजर खेळत होता. तेथील सामनादेखील त्याने जिंकला. त्यानंतर 4 ऑगस्टला पेस रिओत दाखल झाला. सकाळी तिथे पोहोचल्यावर त्याला खोलीबाबतच्या गोंधळाची कल्पना आली. पण तरीही त्यात वेळ न घालवता त्याने सरावाला प्राधान्य दिले. रिओ क्रीडानगरीत राहणार असल्याचे त्याने आधीच कळवले होते. परंतु तरीही त्याच्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आली.

“देशासाठी खेळत असताना तुम्हाला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्याकडे लक्ष न देता तुम्ही खेळावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे” असं पेसचं म्हणणं आहे. भारताकडून सर्वाधिक 7 वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा पेस हा पहिला खेळाडू आहे. यावेळी तो रोहन बोपण्णासह पुरूष दुहेरीत सहभागी होत आहे.