कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परंतु बांग्लादेश दौऱ्यानंतर वरिष्ठ संघाच्या संचालक पदावरील रवि शास्त्री यांच्या भविष्यावर असमाधानी स्थिती सुरू आहे.
टीम इंडियाचे निवृत्त खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भारतीय क्रिकेटच्या भविष्यावर पहिल्यांदाच चर्चा करण्यात आली. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया उपस्थित होते.
बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, राहुल द्रविड भारताच्या अ आणि १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी काम करण्यास तयार आहेत. भारताकडून १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळलेल्या ४२ वर्षीय राहुल द्रविडला राष्ट्रीय वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाचा दावेदार मानलं जात आहे. परंतु आपल्या कौटुंबिक जबाबदारीमुळं तो तुर्तास इच्छुक नाही. द्रविडनं कसोटी सामन्यांमध्ये १३,२८८ तर एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,८८९ धावा बनविल्या आहेत.
भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याच्या जबाबदारीसाठी तिघंही दिग्गज उत्सुक आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.