नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत त्यांच्याच मातीत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपसाठी सज्ज झालाय. २००७मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता भारतात हा वर्ल्डकप होतोय.
टी-२०मध्ये भारतीय संघ सध्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर मायभूमीत श्रीलंकेला २-१ ने हरवले. त्यामुळे वर्ल्डकपमध्येही हाच विजयरथ कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्यापूर्वी आशिया कपही होणार आहे.
भारतीय संघ गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीही आघाड्यांवर चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी सलमावीर शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरैश रैना, युवराज सिंग, हार्दिक पांड्या चांगली कामगिरी करतायत. तर दुसरीकडे गोलंदाजही त्यांचे काम चोख करतायत. या पार्श्वभूमीवर वर्ल्डकपसाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.
मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला अंतिम ११मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत धोनीने दिलेत. टी-२०मध्ये अजिंक्यची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. सध्या सलामीवीर शिखर आणि रोहित चांगले फॉर्मात आहेत. त्यामुळे अजिंक्यला स्थान मिळण्याची शक्यता कमी वाटते. मात्र जर दोनही सलामीवीर चांगल्या फॉर्मात असतील तर क्रिकेटपटूंची निवड कऱणे कर्णधारासाठी कठीण काम असते, असे धोनी म्हणाला.
आठ मार्चपासून भारतात वर्ल्डकपला सुरुवात होतेय. १५ मार्चला भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होत आहे.