कार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू

कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 18, 2017, 10:53 AM IST
कार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू title=
YouTube (Screen Grab)

चेन्नई : कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला. 

अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीला धडक दिली आणि लगेच पेट घेतला. अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. 

अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. पोरुर जवळच्या अल्पाक्कम येथे अश्विन आणि त्याची पत्नी राहत होते. एमआरसी नगर येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी ते गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. त्याची पत्नी निवेदीता डॉक्टर होती. ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.
 
पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आगीत दोघांचा कोळसा झाला. गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.