एकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: Jun 1, 2016, 06:27 PM IST
एकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या मेसेजमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि प्रणव धनावडेची तुलना करण्यात आलीये. अर्जुननं नॉर्थ झोनकडून खेळताना १२ ओव्हरमध्ये ५२ रन दिल्या, त्याला एकही विकेट घेता आली नाही, तर प्रणवनं फक्त ३२३ बॉलमध्ये १००९ रन केल्या.   

तरीही १६ वर्षाखालील संघात अर्जुनची निवड कऱण्यात आली आणि प्रणव धनावडेची नाही. त्यामुळे जोपर्यंत द्रोणाचार्य जिवंत आहे. तोपर्यंत एकलव्य असाच अर्जुनकडून हरत राहणार, असं या मेसेजमध्ये म्हटलंय.

काय आहे या मागचं सत्य ?

पायडे ट्रॉफीमध्ये अर्जुननं चांगलं प्रदर्शन केलं. या सीरिजमध्ये त्यानं एक सेंच्युरी लगावली, तसंच ४ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे अर्जुनची अंडर १६ च्या टीममध्ये निवड करण्यात आली. प्रणव मात्र या सीरिजमध्ये खेळला नाही, त्यामुळे त्याची अंडर १६ मध्ये निवड झाली नाही. 

प्रणवनंही दिलं स्पष्टीकरण

या वादावर अखेर प्रणव धनावडेनंही स्पष्टीकरण दिलं आहे. वेस्ट झोनच्या टीमची निवड मुंबई आणि स्टेटच्या मॅचमधल्या कामगिरीवर झाली. माझी कामगिरी चांगली झाली नसल्यानं माझी टीममध्ये निवड झाली नाही, असं प्रणव म्हणाला आहे. तसंच माझं रेकॉर्ड बनण्याच्या आधीच निवड झाली होती, अशी प्रतिक्रिया प्रणवनं दिली आहे. 

प्रणवकडून अर्जुनचं कौतुक

अर्जुननं स्टेटच्या सगळ्याच मॅचमध्ये चांगली कामगिरी केली त्यामुळे त्याची अंडर १६ मध्ये निवड झाली. या निवडीबद्दल मी अर्जुनला शुभेच्छाही दिल्या आहेत. माझी अंडर १९मध्ये निवड होईल अशी माझी अपेक्षा आहे, असं प्रणव म्हणाला आहे. 

मी आणि अर्जुन चांगले मित्र आहोत. पाच वर्ष आम्ही एमआयजी क्लबकडून एकत्र खेळलो. या अफवा लवकरात लवकर बंद व्हाव्यात, असं वक्तव्य प्रणवनं केलं आहे. अर्जुनची क्षमता आणि कामगिरी बघता त्याची झालेली निवड योग्य असल्याचं प्रणवला वाटत आहे. 

प्रणवच्या वडिलांचं स्पष्टीकरण

ज्यांनी ही अफवा पसरवली, त्यांना क्रिकेट टीमच्या निवड प्रक्रियेविषयी माहिती नाही, असं प्रणवचे वडिल प्रशांत धनावडे म्हणाले आहेत. सचिनचा मुलगा असल्यानं अर्जुनला बदनाम करणं चुकीचं आहे, खेळाला खेळ म्हणूनच बघा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

प्रणव मुंबईकडूनच खेळला नाही तर झोनल कसा खेळेल, त्याची कामगिरी चांगली नव्हती म्हणून त्याची निवड झाली नाही, असंही प्रणवचे वडिल म्हणाले आहेत.