कराची: पाकिस्तानी क्रिकेट टीमचं प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून चांगलं होत नाहीये. टीममधल्या खेळाडूंचं कमी शिक्षण हे या मागचं कारण असल्याचं अजब वक्तव्य पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी केलं आहे.
पाकिस्तानी टीममध्ये सध्या फक्त मिसबाह उल हक हा एकच खेळाडू ग्रॅज्युएट आहे. बाकीच्या खेळाडूंचं शिक्षण कमी आहे, त्यामुळे आम्ही भविष्यात टीममध्ये शिक्षित खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रोत्साहित करु असंही शहरयार खान म्हणाले आहेत.
शिस्त आणि फिटनेस या दोन्ही मुद्द्यांवर यापुढे तडजोड केली जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे. अहमद शहजाद आणि उमर अकमल यांना शिस्त न पाळल्यामुळे टीममधून बाहेर करण्यात आल्याची प्रतिक्रिया खान यांनी दिली आहे.