मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशन (एमसीए) निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. एमसीए निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. मी धावाच नव्हे तर योगदानाची शतके केली आहेत, असे उत्तर उद्धव यांनी दिले. तर एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत एकत्र असलेले शिवसेना-भाजप एकमेकांसमोर उभे ठाकलेत. योग्य उमेदवार दिला असता तर भाजपला पाठिंबा दिला असता असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
भाजपच्या आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. विजय पाटील यांना पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्षानं वानखेडेची खेळपट्टी उखडली होती. आता असे लोक एमसीएमध्ये आल्यास आणि त्यांचं कुणी ऐकलं नाही तर स्टेडियममध्ये घुसून पुन्हा खेळपट्टी उखडणं असाच त्या पक्षाचा एजेंडा असल्याची टीका शेलार यांनी केलीय. पवार-महाडदळकर गटाकडून आशिष शेलार एमसीएची निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, सत्ताधारी पवार - म्हाडदाळकर गटाचे उमेदवार व विद्यमाना एमसीए अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांच्यामध्ये अध्यक्षपदाची मुख्य लढत आहे. तसेच ३२९ क्लब्सच्या मतदानाने रंगणारी ही निवडणूक आता ३२६ क्लब्सच्या मतदानावर लढेल. तीन क्लब्सने एमसीएची वार्षिक फी भरली नसल्याने त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमसीए सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वाधिक कौल कोणाला मिळतो याची उत्सुकता आज संपेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.