वेलिंग्टन : श्रीलंकेचा कुमार संगकारा हा वन डे क्रिकेटमधला सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बनला आहे. संगकाराने आंतरराष्ट्रीत वन डेत यष्टिरक्षण करताना सर्वाधिक डिसमिसल्सचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन वन डेत संगकारानं कोरी अँडरसन आणि टीम साऊदीचे झेल टिपले आणि संगकाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टच्या नावावर वन डेत सर्वाधिक ४७२ डिसमिसल्स होते.
तर संगकाराच्या नावावर आता ३९७ वन डेत ४७४ डिसमिसल्स जमा झाली आहेत. त्यानं ३७८ वेळा यष्टिमागे झेल टिपले असून ९६ फलंदाजांना यष्टिचीत केलं आहे.वेलिंग्टन वन डेत संगकारानं नाबाद शतकही ठोकलं. त्याच्या १०५ चेंडूंमधील नाबाद ११३ धावांच्या खेळीमध्ये १४ चौकारांचा समावेश होता.
संगकाराच्या याच खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं ६ बाद २८७ धावांवर मजल मारली आणि न्यूझीलंडला २५३ धावांत गुंडाळून विजय साजरा केला. तर न्यूझीलंडनं सात सामन्यांची ही मालिका ४-२ अशी खिशात टाकली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.