कराची: पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात खेळताना मिळतं हे वक्तव्य केलेल्या शाहिद आफ्रिदीवर पाकिस्तानमधून टीकेची झो़ड उठली आहे.
अशी वक्तव्य करताना खेळाडूंनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद म्हणाला आहे. तसंच अशा खेळाडूंची मला लाज वाटते अशी टीकाही त्यानं केली आहे.
भारतानं आपल्याला काय दिलं, जरी तुम्ही भारताच्या दौऱ्यावर असाल तरी सत्य बोला, मागच्या पाच वर्षांमध्ये भारतानं आपल्यासाठी आणि आपल्या क्रिकेटसाठी काय केलं, अशा उलट्या बोंबाही मियांदादनं मारल्या आहेत.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहसिन शेख यानंही या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. आफ्रिदी आणि मलिक हे वरिष्ठ खेळाडू आहेत, असं वक्तव्य करताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मोहसिन म्हणाला आहे.
भारतातल्या सुरक्षेची कारणं पुढे करत आधी पाकिस्ताननं एक समिती भारतातली सुरक्षा पाहायला पाठवली. पण भारतामध्ये आम्हाला सुरक्षित वाटतं असं वक्तव्य शोएब मलिकनं केलं, तर पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम भारतात मिळतं असं आफ्रिदी म्हणाला. त्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.